ज्ञानराधा सोसायटी : ठेवीदारांचा जीव टांगणीला; 30 कोटींच्या ठेवी
सेलूतील सोसायटीमधून पैसे परत घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा
सोसायटीवरील विश्वास उडाल्याने ग्राहक व ठेवीदार चिंतेत आहेत. संताप व्यक्त करीत आहेत. गोरगरीब, शेतकरी व सामान्य नागरिकांच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या तातडीने परत देण्याची व्यवस्था सोसायटीने करावी, अशी ग्राहकांची मागणी आहे. – राजेंद्र केवारे, ठेवीदार, सेलू जि.परभणी
सेलू जि.परभणी : बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तोट्यात आल्याची अफवा परसल्याने दोन दिवसांपासून सर्वत्र खळबळ उडाली आहे. सेलू येथील क्रेडिट सोसायटीच्या शाखेमध्ये ठेवींसह पैसे काढण्यासाठी शुक्रवारी,१३ ऑक्टोबरलाही सकाळपासूनच ग्राहक व ठेवीदारांच्या रांगा लागल्या होत्या. ग्राहक व ठेवीदारांची चिंता वाढल्याचे चित्र आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या को.ऑपरेटिव्ह सोसायटीची मुख्य शाखा बीड येथे आहे. चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे यांच्या बीड येथील तिरूमला उद्योग समुहाची तपासणी आयकर विभागाचे काही अधिकारी तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्ञानराधा सोसायटी तोट्यात आल्याची अफवा गुरुवारी पसरल्याने ठेवीदार, ग्राहकांनी ठेवी व पैसे काढण्यासाठी सेलू येथील शाखेसमोर तोबा गर्दी केली आहे. याबाबत माहिती देताना शाखा व्यवस्थापक आर.बी.चाळक म्हणाले की, सेलूतील तालुक्यामध्ये सोसायटीचे एकूण खातेदार सभासद संख्या सुमारे ३५०० आहे. सहाशे ठेवीदारांच्या एकूण ३० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. १९ कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे. व्यवहार सुरळीत चालू आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत सुमारे शंभर ठेवीदारांचे आरटीजीएस फॉर्म भरून घेण्यात आले आहेत. बीड येथील मुख्य शाखेकडे पाठविण्यात आले आहेत.
तिरुमला ग्रुप आणि सोसायटीचे चेअरमन सुरेश कुटे हेच आहेत. पण सोसायटीचा व्यवहार स्वतंत्र आहे. सोशल मीडियावरून सोसायटी तोट्यात गेल्याचा अफवा झाली. यामुळे ग्राहकांनी पैसे घेण्यासाठी गर्दी केली. आरटीजीएसद्वारे ग्राहकांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सहकार्य करावे. – आर.बी.चाळक, शाखा व्यवस्थापक, ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी, सेलू