Indian Stepwells : आर्वी, चारठाणा, पिंगळी, वालूरची चौकोनी बारव पोस्टकार्डवर
बारव संवर्धनाची मोहीमेला मोठे यश : महिमापूर, मंचर, गिरणारे, सातारा येथील बारवांचाही समावेश
वालूरला जागतिकस्तरावरील एकमेव हेलिकल स्टेपवेल बारव याआधी पोस्ट कार्डवर झळकली. त्यापाठोपाठ चौकोनी बारवाची नोंद घेतली गेली. गावातील बारवांचे काम लोक सहभागातून करण्यात आलेले आहे. यापुढे पायाभूत सुविधांसाठी सरकारकडून पर्याप्त निधी मिळणे गरजेचे आहे. – संजय साडेगावकर, शैलेश तोष्णीवाल, वालूर
सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील वालूर येथील ‘हेलीकल स्टेपवेल’ची मोहर पोस्ट कार्ड व आंतर्देशीय पत्रावर उमटविल्यानंतर, राज्यातील आणखी आठ बारवा पोस्टकार्डवर झळकल्या आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्यातील आर्वी, चारठाणा, पिंगळी आणि वालूर येथील बारवांचा समावेश आहे.
टपाल विभागाने बारवांचा वारसा, संवर्धन आणि त्या संदर्भातील माहिती सर्वदूर पोहोचण्यासाठी वास्तू शास्त्रीय आरेखन पूर्ण झालेल्या राज्यातील आठ बारवांची नोंद घेतलेली पुस्तिका प्रकाशित केली आहे. राष्ट्रीय टपाल दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र क्षेत्राचे मुख्य पोस्टमास्तर जनरल के.के.शर्मा आणि पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी बुधवारी ही माहिती पुस्तिका प्रकाशित केली आहे. यामध्ये राज्यातील आठ बारवांचा समावेश आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील आर्वी, चारठाणा, पिंगळी आणि वालूर (चौकोनी बारव) या बारवांची माहिती पुस्तिकेत नोंद झाली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बारव संवर्धन मोहीमचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी दिली. महिमापुर (अमरावती), बाजीराव विहीर (सातारा), मंचर (पुणे) आणि नाशिकमधील गिरणारे येथील बारवांचादेखील यामध्ये समावेश आहे, असे महाराष्ट्र बारव संवर्धन मोहिमेचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांच्या श्रमदान सहकार्याने बारव संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनेक नामशेष आणि बुजलेल्या बारवांचा शोधही या मोहिमेतून लावण्यात आला आहे. वास्तुशास्त्र आणि जलस्रोताचा वारसा सांगणाऱ्या दोन हजार बारवांच्या संवर्धनाचे काम लोकसहभागातून हाती घेऊन त्यांची अचूक ठिकाणे नकाशावर आणली गेली आहेत. “इंडियन स्टेप वेल्स ” या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. हेलिकल, एल, झेड, शिवपिंडी आकार, चौकोनी ,आयातकृती आकारातील विविध वास्तू कलेतील या बारव आहेत. परंतु, त्यांचे आकार, वापरलेली सामग्री आणि पाण्याची साठवण क्षमता भिन्न असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या आधी जागतिक वारसा दिनानिमित्त महाराष्ट्र सर्कल पोस्टल विभागाच्या वतीने १८ एप्रिल २०२३ रोजी परभणी जिल्ह्यातील वालूर येथील कुंडलाकार (हेलीकल स्टेपवेल) बारव व अहमदनगर जवळच असलेल्या दारेवाडी येथील हत्ती बारवांची मोहर पोस्टकार्ड व आंतर्देशीय पत्रावर उमटविलेली आहे.
लोकसहभागातून होणाऱ्या राज्यातील बारवांच्या जतन, संवर्धन आणि पुनर्जीवनाच्या प्रयत्नांना यश आले आहे. याद्वारे पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल. पोस्टकार्डवर बारवांचे अंकन प्रसिद्ध झाले. टपाल सेवा विभागाचे आभारी आहोत. – रोहन काळे, संस्थापक , महाराष्ट्र बारव पुनर्जीवन व जतन मोहिम, मुंबई
परभणी जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब अभिमानाची आहे. ऐतिहासिक वारसा स्थळ असणाऱ्या गावातील ग्रामस्थांच्या पुढाकाराचे मोठे यश आहे. बारवा, प्राचीन मंदिराकडे दुर्लक्ष करू नका. जपवणूक करा. – मल्हारीकांत देशमुख, प्रमुख, बारव मोहीम, परभणी