नवरात्र महोत्सव : सेलूतील आदिमाया तुळजाभवानी मंदिरात विविध कार्यक्रम
सेलू्तील सूरज मोहल्ल्यातील कृष्णा गोरे यांच्यासह भाविकांचा पुढाकार
गुलमोहर कॉलनीमध्ये सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे श्री तुळजाभवानी मातेचे छोटेसे जुने मंदिर आहे. जुन्या काळापासून ‘मळ्यातील देवी’ म्हणून मंदिर प्रसिद्ध आहे. पूर्वी आसारामजी लोया यांचा मळा म्हणून हा परिसर ओळखला जात असे. सेलू शहराच्या विस्तार लक्षात घेऊन बालाप्रसादजी लोया यांनी या ठिकाणी नवीन कॉलनी निर्माण केल्याचे सांगितले जाते. जुने देवीचे मंदिर असल्याने येथील विकासाला चालना देण्यासाठी निश्चित वाव आहे, असे दिसून येते.
सेलू : येथील गुलमोहर कॉलनीमधील पुरातन आदिमाया श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. माजी नगरसेवक कृष्णा गोरे यांनी ही माहिती दिली.
सेलू शहरातील जुन्या वालूर रोडवरील बन्सीलालनगरला लागून असलेल्या गुलमोहर कॉलनीमध्ये सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे श्री तुळजाभवानी मातेचे छोटेसे जुने मंदिर आहे. जुन्या काळापासून ‘मळ्यातील देवी’ म्हणून मंदिर प्रसिद्ध आहे. पूर्वी आसारामजी लोया यांचा मळा म्हणून हा परिसर ओळखला जात असे. सेलू शहराच्या विस्तार लक्षात घेऊन बालाप्रसादजी लोया यांनी या ठिकाणी नवीन कॉलनी निर्माण केल्याचे सांगितले जाते. जुने देवीचे मंदिर असल्याने सेलूतील भाविक नवरात्र महोत्सवात भक्तिभावाने दर्शनासाठी आवर्जून जातात. खासकरून सायंकाळी गर्दी दिसून येते. सूरज मोहल्ल्यातील नागरिकांच्या पुढाकाराने गेल्या पंचेवीस वर्षांपासून नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. यावर्षीही पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे माजी नगरसेवक कृष्णा गोरे यांनी सांगितले. रविवारी होमहवन आहे. सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, असे गोरे म्हणाले. पूर्वी सूरज मोहल्ल्यातील रंगनाथ गायके, जनाबाई गायके सेवा देत असत. सध्या नागनाथ जगदाळे, शुभम, विशाल, इंदुबाई आराधी म्हणून आहेत. नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिर परिसराला रंगरंगोटी, रोषणाई करण्यात आली आहे. जुने देवीचे मंदिर असल्याने येथील विकासाला चालना देण्यासाठी निश्चित वाव आहे, असे दिसून येते.