आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडासुविधा सेलूमध्ये : आमदार मेघना बोर्डीकर
शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धा उत्साहात, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड संघांची बाजी
अभ्यासासोबतच क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन, स्वप्न आणि ध्येयपूर्तीसाठी प्रत्येकाने झपाटून कामाला लागले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत 2036 च्या ऑलंपिक स्पर्धेचे यजमानपद स्वीकारत आहे. या स्पर्धेत सेलूतील खेळाड़ूही निश्चित चमकतील. त्यासाठी सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडासुविधा सेलूमध्ये मिळवून देण्याची ग्वाही आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी दिली.
सेलू जि.परभणी : छत्रपती संभाजीनगर विभागीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धा सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर शनिवारी, २१ ऑक्टोबररोजी आयोजित उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तीन, परभणी व बीडच्या एकेका संघाने बाजी मारली.
आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, दत्तराव पावडे, राज्य खो-खो क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, परवेज खान, मनोज बनकर, मुख्याध्यापक नारायण सोळंके, संतोष पाटील, डी.डी.सोन्नेकर, गणेश माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, परभणी व परभणी जिल्हा सेपक टकरा असोसिएशन आणि सेलू् येथील नूतन विद्यालयाच्या संयुक्त सहकार्याने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत १४, १७, १९ वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे २६ संघ सहभागी झाले होते. १९ वर्षे मुले, मुली आणि १७ वर्ष मुले गटात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण संघाने बाजी मारली. बीडच्या १७ वर्षे मुली, तर परभणी ग्रामीणच्या १४ वर्षे मुलींचा संघ विजेता ठरला. विजेत्या संघांची सोलापूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेसाठी पंच अभिजित शिंदे, तुषार चौधरी, सतीश नावाडे, गणेश माळवे, डी.डी.सोन्नेकर, प्रा.के.के.कदम, नागेश कान्हेकर, प्रशांत नाईक, बाळू बुधवंत, एफ.के.गावीत आदींसह क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.