Maratha Reservation : सेलूमध्ये आमरण उपोषण; कँडल मार्च
महिला व डॉक्टर्स असोसिएशनही सहभाग घेणार
सेलू जि.परभणी : मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देवून, तात्काळ आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवली जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून सेलू शहरातील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात चार दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारला जाग आणण्यासाठी साखळी उपोषणाचा टप्पा ओलांडून शहरातील चार तरूणांनी शनिवारपासून (२८ऑक्टोबर) आमरण उपोषण सुरू केले आहे. जयसिंग शेळके, प्रसाद महाराज काष्टे, भाऊसाहेब झोल, एकनाथ बोरूळ आदींचा समावेश आहे. शनिवारच्या साखळी उपोषणात सतिश आकात, वैभव कदम, कृष्णा वाघ, सागर वावरे, बाळासाहेब कदम, संभाजी कदम, अविनाश गायकवाड आदींनी सहभाग नोंदविला. शनिवारी रात्री कीर्तनानंतर कँडल मार्च काढण्यात आला.
आंदोलनस्थळी दररोज रात्री आठ ते दहा कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. हभप बाळू महाराज गिरगावकर, हभप माऊली महाराज खडकवाडीकर, हभप मानिक महराज रेंगे आदींनी सेवा दिली आहे. शनिवारी रात्री कीर्तनानंतर कँडंल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. साखळी उपोषणस्थळी दररोजची रात्री गणेश ढेंगळे, गोविंद शिंदे, अनिकेत शिंदे, संतोष राऊत, पंकज शेलार आदी तरूण दररोज रात्री नऊ ते सकाळी नऊपर्यंत साखळी उपोषणात सहभाग नोंदवित आहेत. तसेच सकाळी नऊ ते रात्री नऊ दरम्यान करजखेडा, फुलेनगर, सारंगी गल्ली, दत्तनगर, मठगल्ली, विद्यानगर आदी भागातील तरूणांनी नियमितपणे साखळी उपोषणात सहभाग नोंदविला आहे. रविवारी रोजी शहरातील महिला दिवसभर साखळी उपोषणात सहभाग नोंदवणार असून सायंकाळी चार ते सात दरम्यान शहरातील सर्व डॉक्टर्स सहभाग घेतील.