परभणी जिल्हा ‘बंद’ची हाक : आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून मंगळवारी, ३१ ऑक्टोबररोजी परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. परभणीत वसमत रस्त्यावरील काळी कमान समोर, जिंतूर रस्त्यावरील विसावा फाटा आणि गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. सेलू येथील रायगड कॉर्नरवर रास्ता रोको आहे. दरम्यान, एक नोव्हेंबरला परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात येणार असून आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून गावागावातून शहरामध्ये जाणारा संपूर्ण शेतमाल बंद करण्याचा इशारा परभणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
Maratha Reservation : “आरक्षण मिळेपर्यंत शाळा नाही”
पावडे हदगाव शाळेत विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी, मोरगाव येथील साखळी उपोषणातही विद्यार्थ्यांचा सहभाग
सेलू जि.परभणी : मराठा समाजाला सरकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात शाळकरी मुलेही सहभागी होत असल्याचे चित्र आहे. परभणी जिल्ह्यातील पावडे हदगाव (ता.सेलू्) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी, ३० ऑक्टोबररोजी ‘ जो पर्यंत आरक्षण नाही, तो पर्यंत शाळा नाही अशी घोषणाबाजी केली, तर मोरेगाव येथील साखळी उपोषणात जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ‘ एक मराठा लाख मराठा ‘च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
तहसीलदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या
परभणी : मानवत तालुक्यातील मानोली या गावातील १० ते १५ तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून जलकुंभावर चढून सोमवारी आंदोलन केले. आंदोलनाला भेट देण्यासाठी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर गेले असता त्यांची गाडीच्या काचा फोडून संतप्त आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त केला. दरम्यान जलकुंभावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची उपविभागीय अधिकरी शैलेश लाहोटी, सेलूचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे व तहसीलदार यांनी मनधरणी केली. त्यानंतर तरुणांनी आंदोलन मागे घेतले.
रास्ता रोको, टायर जाळून निषेध
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे , या मागणीसाठी सेलू – देवगावफाटा रस्त्यावरील डिग्रस बरसाले पाटीवर सोमवारी ग्रामीण भागातील मराठा आंदोलकांनी रस्ता रोको करीत संताप व्यक्त केला. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलीस व महसूल प्रशासनाने हस्तक्षेप केल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. पूर्णा तालुक्यातील झिरो फाट्यावरही सोमवारी दुपारी महामार्गावर टायर पेटवून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. संतप्त आंदोलकांनी पूर्णा तहसील कार्यालयाच्या वाहनांच्या काचाची तोडफोड करण्यात आली.
पाथरीत कडकडीत बंद
परभणी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ सकल मुस्लिम समाजाच्या वतीने सोमवारी पाथरी बंदची हाक देण्यात आली होती. बाजारपेठातील व्यापार्यांसह छोट्या मोठ्या विक्रेत्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठींबा दिला.
विशेष अधिवेशन बोलवा
परभणी : मराठा व धनगर आरक्षण प्रश्नी विधानसभा व लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी राज्यपाल व राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे केली आहे. तर राज्यात सध्या मराठा व धनगर आरक्षणाची मागणी लावून धरण्यात येत असून या प्रश्नी विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमत्र्यांकडे केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांनीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र दिले आहे.
आमदार सुरेश वरपुडकरांचा राजीनामा
परभणी : मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी सोमवारी, ३० ऑक्टोबररोजी सायंकाळी विधानसभा अध्यक्षांना राजीनामा सुपूर्द केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सर्वस्वी पाठींबा देत असून सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्यात यावे. तसेच धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मागील कित्येक वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे, त्याची दखल न घेता धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण देण्याची भूमिका शासन घेताना दिसत नाही. धनगर समाजास उपेक्षित प्रवर्गातील आरक्षण जाहीर करावे. त्याचप्रमाणे मुस्लीम बांधवाना सुध्दा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ज्या प्रवर्गात आरक्षणाची गरज आहे. ते आरक्षण मुस्लीम समाजास देण्यात यावे. या मागण्यांसाठी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे आमदार वरपुडकर यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.