प्रा.विश्वामित्रे यांचा सेवागौरव; सेलूतील नूतन कन्या शाळेत कार्यक्रम
“प्रत्येक शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करताना नाट्यकलावंताप्रमाणे विविध भूमिका पार पाडत असतो. प्रा.किशोर विश्वामित्रे हे खऱ्या रंगभूमीवरील नाट्यकलावंत आहेत.” असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर यांनी काढले.
सेलू जि.परभणी : सेलू येथील श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या प्रशालेच्या उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक किशोर विश्वामित्रे यांचा मंगळवारी सेवागौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया होते. सचिव प्राचार्य डॉ.व्ही. के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, वनिता विश्वामित्रे, संगीता खराबे, दत्तराव घोगरे, रोहिदास मोगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती प्रतिमा पूजनाने आणि रेणुका अंबेकर यांच्या गणपती स्तवनाने झाली. सुहास देऊळगावकर, ज्योती कुंभकर्ण, रोहिदास मोगल, बाबासाहेब थोरे, अनिल शेळके यांनी मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी प्रा.किशोर विश्वामित्रे यांचा सपत्नीक शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन संस्था, प्रशाला, मित्रपरिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रा.विश्वामित्रे यांनी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि ‘नटसम्राट’ मधील आप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका नाट्यरूपात सादर केली. अध्यक्षीय समारोप अध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, प्रा. किशोर विश्वामित्रे यांचा मित्रपरिवार यांची उपस्थिती होती.