Maratha Reservation : आरक्षणासाठी परीक्षांवर बहिष्कार; जिंतूर तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचा निर्णय
परभणी : जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत सहामाही व वार्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी, दोन नोव्हेंबर रोजी तंत्रनिकेतनसमोर आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे महाविद्यालय भरेल, असे वाटत असतानाच अचानक सर्व मुले शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमली. क्षणभर काही कळायच्या आतच घोषणा सुरू झाल्या. ‘आरक्षण नाही तोपर्यंत परिक्षा नाय’ असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. उपोषणस्थळी बसलेल्या मराठा बांधवांना पाठिंबा देत ‘आरक्षण नाही तर परीक्षा नाही’ याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनावर आदित्य गायकवाड, नरेश बिराजदार, शुभम शिंदे, अंकुश नेवरे, अजिंक्य देवकर, योगेश सोळंके, गणेश जाधव आदींसह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१४ गावातील विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
परभणी : मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ गुरुवारी सकाळी मानवत तालुक्यातील कोल्हापाटी येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणामध्ये कोल्हा जिल्हा परिषद सर्कलमधील १४ गावातील विद्यार्थ्यानी ठिय्या मांडून आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. मानवत तालुक्यातील कोल्हा , इरळद, सोमठाणा ,आटोळा ,कोथाळा , मगरसावंगी , नरळद , पारडी , टाकळी , राजुरा ,करंजी मानोली, गोगलगाव शेवडी आदी चौदा गावातील विद्यार्थी निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.