परभणीमध्ये २ हजार ४१ नोंदीचे पुरावे; कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरण सुरू
जिल्ह्यातील सर्व संबंधीत विभागाकडे उपलब्ध असलेल्या सुमारे २० लाख ७५ हजार नोंदी तपासल्या असून, त्यापैकी सन १८८३ ते सन १९१० या कालावधीतील २ हजार ४१ नोंदीचे पुरावे प्रशासनाला सापडले आहेत. यात महसुली, शैक्षणिक, भूमी अभिलेख आदी विभागाकडील कच्च्या आणि पक्क्या नोंदी, हक्कनोंद, नमुना १२, त्यासोबतच खासरा उताऱ्यांच्या नोंदी सापडल्या असून यामुळे कुळातील किंवा कुटुंबातील अनेक सदस्यांना याआधारे प्रमाणपत्र देण्यासाठी मदत होणार असल्याचेही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले
परभणी : पालम तालुक्यातील वरखेड येथील शैलेश दशरथ घोडके आणि तुकाराम भुजंगराव गरुड या दोन युवकांना शुक्रवारी, तीन नोव्हेंबररोजी पहिले कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अनुराधा ढालकरी, जिवराज डापकर, कैलास वाघमारे यांची उपस्थिती होती. शैलेश घोडके आणि तुकाराम गरुड यांच्या आजोबा-पणजोबांच्या हक्क नोंदणी प्रमाणपत्राच्या शासन दरबारी नोंदी, वंशावळी आणि वारसा नोंदी आढळून आल्या आहेत. या सर्व नोंदींसोबत या युवकांकडील कागदपत्रे जुळली असून, यामुळे या युवकांच्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शासनाकडे पाठवलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधीत विभागाकडे उपलब्ध असलेल्या सुमारे २० लाख ७५ हजार नोंदी तपासल्या असून, त्यापैकी सन १८८३ ते सन १९१० या कालावधीतील २ हजार ४१ नोंदीचे पुरावे प्रशासनाला सापडले आहेत. यात महसुली, शैक्षणिक, भूमी अभिलेख आदी विभागाकडील कच्च्या आणि पक्क्या नोंदी, हक्कनोंद, नमुना १२, त्यासोबतच खासरा उताऱ्यांच्या नोंदी सापडल्या असून यामुळे कुळातील किंवा कुटुंबातील अनेक सदस्यांना याआधारे प्रमाणपत्र देण्यासाठी मदत होणार असल्याचेही श्री.गावडे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांच्या वंशावळी, वारसा नोंदी जुळल्यानंतर त्यांना कुणबी मराठा-मराठा कुणबी जात प्रमाणपत्राचे दाखले देण्यात येणार असून, जिल्ह्यात मराठा समाजातील युवकांना हे जात प्रमाणपत्र वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी संबंधीत कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन गावडे यांनी केले आहे.
वडील शेतकरी असून, एक एकर शेती आहे. मी सध्या कला शाखेत शिक्षण घेत आहे. कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळाल्याचा आनंद आहे. भविष्यात शिक्षण आणि नोकरीसाठी याचा नक्कीच फायदा होईल. – शैलेश दशरथ घोडके, वरखेड, ता.पालम
पूर्ण…