Dumping Ground Selu : सेलूतील कचरा प्रश्न पेटला; डंपिंग ग्राऊंडला विरोध 

Dumping Ground Selu : सेलूतील कचरा प्रश्न पेटला; डंपिंग ग्राऊंडला विरोध 

नियोजित डंपिंग ग्राउंडला परिसरातील नागरिकांचा विरोध, आंदोलनाचा इशारा, मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सेलू जि.परभणी : नगरपालिकेच्या वतीने सेलू  परिसरात नियोजित डंपिंग ग्राउंड करण्याचा घाट घातला असुन याला निकटच्या परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेत तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरूवारी, 9 नोव्हेंबररोजी मुख्याधिकारी देविदास जाधव यांची भेट घेऊन या नियोजित डंपिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या संभावित दुष्परिणामाची जाणीव करुन दिली. या ठिकाणी डंपिंग ग्राउंड करू नये, याकडे लक्ष वेधले.
निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही नागरी वस्तीजवळ डंपिंग ग्राउंड होते. त्या ठिकाणी नगरपरिषदने खणून ठेवलेल्या खड्ड्यात पडून एका बालकाचा दुर्देवी मूत्यु झाला होता. त्यानंतर सदरच्या जागेवरील डंपिंग ग्राउंड हटविण्यात आले. वास्तविक डंपिंग ग्राउंडची जागा हदगाव येथे असून त्या ठिकाणी सेलू नगर पालिकेने निधी खर्च करुन जागा विकसित केली होती. आता, पुन्हा नव्याने शहरालगत व अरबी मदरसाजवळच गट नंबर 88, 88/1, 89 परिसरात नियोजित डंपिंग ग्राउंड करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल तसेच पर्यावरणाचीही ऱ्हास होईल. त्यामुळे डंपिंग ग्राउंड शहरापासून दूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.  मागणीकडे दुर्लक्ष करुन तेथेच डंपिंग ग्राउंड करण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांतर्फे तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगरसेवक शेख रहीमभाई, सय्यद मुश्ताक रब्बानी,  विनोद तरटे, शेख वाजीद,  इम्तियाजअली खान, सय्यद कलीम, शेख महेमुद, ॲड.शेख मोहसीन,  नासेर खान पठाण , पत्रकार अल्ताफ मास्टर, लालू खान पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!