Sports : राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेची परभणीमध्ये जय्यत तयारी
परभणी : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व परभणी जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर ६९ वी परुष-महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेची जय्यत तयारी सुरु आहे. स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या मैदानावर चार अद्ययावत मैदाने तयार करण्यात आली असून, या स्पर्धेचा आनंद परभणीतील क्रीडा रसिकांना घेता यावा यासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येत आहे. स्पर्धेत राज्यभरातून महिला व पुरुष गटाचे एकूण ४८ संघ सहभागी होणार आहेत. खेळाडू व संघटना पदाधिकारी, पंचाधिकारी, तांत्रिक व निवड समिती सदस्य यांची निवास व भोजन व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. स्पर्धा दिवस-रात्र प्रकाशझोतात खेळवण्यात येणार असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रतापसिंह जामकर, सचिव प्रा.डॉ.पवन बारहात्ते पाटील , संतोष सावंत, खो-खो राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.