Diwali : दीपावली महोत्सवाला परभणीमध्ये प्रतिसाद
महिला बचत गटांचे विविध स्टॉल
परभणी : महिला आर्थिक विकास महामंडळ व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत दीपावली महोत्सवाचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले. महात्मा गांधी पार्कमध्ये तीन दिवस आयोजित या महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.राहुल पाटील, बाळासाहेब झिंजाडे, प्र.सो.खंदारे, अमोल बळे, श्री.पाटील, डॉ.खान यावेळी उपस्थित होते. महोत्सवात महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व मालाची विक्री व प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या मध्ये दीपावलीनिमित्त चिवडा, लाडू, करंजी, चकली, शेव, बालुशाही, बाकरवडी, फरसाण, तूप, पनीर, लोणी, दही, पाणीपुरी, भेळ तसेच विविध मसाले, चटण्या, पणत्या, आकाशदिवे, तोरणे, दिवे, साड्या, रेडीमेड गारमेंट आदी उत्पादने विविध ४० स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.आमदार डॉ.पाटील व जिल्हाधिकारी गावडे यांनी बचत गटांना भेट दिल्या. याप्रसंगी १२ महिला बचत गटांना कर्ज वितरीत केले. चालू वर्षांमध्ये एप्रिल ते सप्टेंबर अखेर ३१ कोटी ५० लक्ष रुपयांचे महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे, कर्ज परतफेडीचे प्रमाण ९९.९ टक्के आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगिण विकास साधण्याचे काम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ३ हजार ९५० बचत गटांच्या माध्यमातून ४५ हजार ५०० महिलांचे संघटन करण्यात आले आहे. महिलांना विविध बँकेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारणीसाठी दरवर्षी ४५ ते ५० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. महोत्सवातील विविध स्पर्धा तसेच उत्कृष्ट विक्री झालेल्या प्रथम तीन स्टॉल्सचा सन्मान करण्यात येणार आहे.अशी माहिती या वेळी देण्यात आली. सूत्रसंचालन जयश्री टेहरे यांनी केले, तर आभार विद्या शृंगारे यांनी मानले.