Namo Tirthsthal Sudhar Abhiyan : प्राचीन मंदिरे, बारवांच्या विकासासाठी निधी
चारठाणा, एरंडेश्वर येथील मंदिरे, वालूर येथील पुरातन बारवांचा समावेश
परभणी जिल्ह्यातील चारठाणा (ता.जिंतूर) येथील गोकुळेश्वर मंदिर व बारव, खुराची आई मंदिर, महादेव मंदिर (जोड मंदिर), उखंडेश्वर मंदिर, गणपती मंदिर, वालूर (ता.सेलू) येथील कुंडलाकार बारव, चतुरस्त्र बारव वालूर, एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथील सिध्देश्वर महादेव मंदिर व बारव आदींचा यामध्ये समावेश आहे.
परभणी : परभणी जिल्ह्यातील चारठाणा, एरंडेश्वर येथील सहा प्राचीन मंदिरे व बारव, वालूर येथील कुंडलाकार व चतुरस्त्र बारवांचा नमो तीर्थस्थळ सुधार अभियानांतर्गत समावेश झाला आहे. जिल्हा वार्षिकसह अन्य निधीद्वारे येथील विकासकामे केली जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर वालूर, चारठाणा, एरंडेश्वर येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. बारव संवर्धन मोहीम अंतर्गत ग्रामस्थांच्या श्रमदानातून या बारवा मोकळा श्वास घेत असून जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांचे डिजिटलायझेशन व क्यू आर कोडींगसह पुनरुज्जीवन होणार आहे. नमो अभियानांतर्गत ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिर व बारवांचे डिजिटल दर्शन घडवणे तसेच परिसर सुशोभीकरण करणे तसेच स्वच्छतेबाबतची कामे केली जाणार आहेत. या कामासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता जिल्हा वार्षिक निधी २०२३-२४, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व नियमित निधीद्वारे करण्यात येणार आहे.
परभणी जिल्ह्यातील चारठाणा (ता.जिंतूर) येथील गोकुळेश्वर मंदिर व बारव, खुराची आई मंदिर, महादेव मंदिर (जोड मंदिर), उखंडेश्वर मंदिर, गणपती मंदिर, वालूर (ता.सेलू) येथील कुंडलाकार बारव, चतुरस्त्र बारव वालूर, एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथील सिध्देश्वर महादेव मंदिर व बारव आदींचा यामध्ये समावेश आहे. बारवांच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांच्या श्रमदानाला व पाठपुराव्याला यश आले आहे, असे वालूर बारव संवर्धन समितीचे संजय साडेगावकर, शैलेश तोष्णीवाल, जिल्हा समन्वक मल्हारीकांत देशमुख यांनी सांगितले.