सेलू बाजार समिती : कापूस खरेदीची प्रतीक्षा संपेना; खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

सेलू बाजार समिती : कापूस खरेदीची प्रतीक्षा संपेना; खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. कापूस विक्रीसाठी तयार आहे. बाजार समितीने कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे. – डॉ.संजय रोडगे, संचालक, सेलू बाजार समिती

परभणी : जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र, सर्वाधिक जिनिंग प्रेसिंग उद्योग असलेल्या सेलू (जि.परभणी) शहरात खरेदीवरून बाजार समितीमध्येच संभ्रम कायम आहे. बाजार समितीने तात्काळ वायदे बाजार द्वारे खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह बाजार समिती संचालकांनी चांगलीच लावून धरली आहे. 

सेलू बाजार समिती अंतर्गत विक्रमी कापूस खरेदी होत असते. शहरात आठ, तर ग्रामीण भागात दोन कापूस जिनिंग आहेत. विदर्भ, तेलंगणासह आजुबाजुच्या जिल्ह्यातून कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक होते. २०२१-२२ च्या हंगामात क्विंटलला तेरा हजार रुपयांपर्यंत कापसाला भाव मिळाला होता. गतवर्षी तो सहा ते हजार रुपयांवर स्थिरावला होता. यंदा मात्र, चांगला भाव मिळेल.‌ अशी शेतकऱ्यांना आशा आहे. परंतु, सेलू येथील बाजार समितीने अद्यापपर्यंत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी विलंब का लागतो ? या बाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, गुरुवारी (२३ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षाच्या वतीने संचालक डॉ.संजय रोडगे, ॲड.दत्तराव कदम आदींनी सभापती चक्रधर पौळ व सचिव राजीव वाघ यांना निवेदन दिले आहे. कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे. निवेदनावर रामेश्वर राठी, गोकर्णा पडघन, प्रसाद डासाळकर व अनिल पवार आदींची उपस्थिती होती.‌‌ बाजार समितीचे कापूस खरेदी केंद सुरू झाल्याशिवाय आवक वाढणार नाही‌‌. दरम्यान, सेलू बाजार समितीमध्ये विक्रमी कापूस खरेदी होत असते.‌ या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्र सुरू करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. जिनिंग चालकांना मजुरांचा काहीसा प्रश्न आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा फायद्यासाठी हंगामातील कापूस खरेदीचा लिलाव लवकरच सुरू होणार आहे, असे बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांनी सांगितले.

शहरातील जिनिंग चालक, खासगी कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांशी चर्चा झाली आहे. बैठकही बोलाविण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात सात जिनिंगमध्ये लिलाव पद्धतीने कापस खरेदी सुरू होईल. शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे.  – चक्रधर पौळ, सभापती, बाजार समिती, सेलू 


पावसाअभावी कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एका जिनिंगसाठी दररोज किमान एक हजार क्विंटल कापसाची आवक आवश्यक आहे. शेतकऱ्यांनाही कापसाला चांगला भाव मिळणे गरजेचे आहे. खासगी खरेदी सुरू आहे. मात्र, सध्या भाव चांगला मिळत नसल्याने आवकही नाही. त्यामुळे जिनिंग प्रेसिंग उद्योग सुरू नाहीत. – महेश खारकर, उद्योजक


 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!