MLA Rohit Pawar : शिक्षकांना इतर कामे नकोतच; ६० हजार शिक्षक भरती तात्काळ करा 

MLA Rohit Pawar : शिक्षकांना इतर कामे नकोतच; ६० हजार शिक्षक भरती तात्काळ करा

परभणी : गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना केवळ अध्यापनाचे काम करु दिले जावे. इतर कोणत्याही प्रकारची कामे शिक्षकांना नकोतच. हा मुद्दा उच्च न्यायालयात मांडण्यात येणार आहे. तसेच ६० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया तातडीने राबविली जावी, अशी मागणी असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सांगितले. मालेगाव येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पवार बोलत होते. या वेळी माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

आरक्षण, राज्याबाहेर पळविलेले उद्योग, जातीनिहाय जनगणना, अडीच लाख पदभरती, शेतकरी, कष्टकरी, तरूण, तरुणी, बेरोजगार, महिला, आदी ३५ मुद्द्यांवर युवा संघर्ष पदयात्रा सुरू आहे. याद्वारे तरुणांसह सर्व सामान्य जनतेचा आवाज नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली. राज्यातील विविध घडामोडींवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार पवार यांनी उत्तरे दिले. आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी मंडळींकडून धर्म आणि जातीय वाद मोठ्या प्रमाणावर वाढविला जात आहे. याद्वारे महाराष्ट्रातील समता, एकता, बंधुतेचा विचार तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू- मुस्लिम ऐवजी आता ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप पवार यांनी केला. भाजपाचा पूर्वीपासूनच आरक्षणला विरोध आहे, असे सांगून मंत्री छगन भुजबळ संवैधानिक पदावर असतांना समतेऐवजी आता भाजपाची समरसतेची भाषा बोलत आहेत‌. अशी टीका पवार यांनी केली.

पवार म्हणाले, राज्यातील 1200 डीएड कॉलेज बंद झाले आहेत. विद्यार्थ्यांचा सरकारवरील विश्वास उडालेला आहे. 40 टक्के इंजिनिअर विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. शिष्यवृत्या रखडल्या आहेत. अडीच लाख पदाची भरती रखडलेली आहे.  सर्व सामान्य माणूस अडचणीत आहे. अडीच लाख पदांची भरती करण्यासंदर्भात अधिवेशनात प्रश्न मांड़णार आहे.

पवार म्हणाले, मराठवाड्यात सोयाबीनची उत्पादकता पन्नास टक्क्यांनी घटली आहे. साडेचार -पाच हजार रूपये भाव मिळत आहे. कापसाची अशीच स्थिती आहे. कमी पावसामुळे कापूस उत्पादन घटले. गेल्या वर्षीचा कापूस शेतकऱ्यांच्या घरात असतांना, दहा ते बारा हजार रूपये भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण ऑस्ट्रेलियांने विश्वकप जिंकण्याच्या आधीच केंद्रसरकारने ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांचा कापूस भारतात आणला. त्यामुळे कापसाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियातील शेतकरी जिंकले. त्यामुळ कापसाचे भाव सहा-सात हजार रूपयावर आले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे. सरकारचे सर्वसामान्य शेतकरी, कष्करी यांच्याकडे दुलर्क्ष आहे. मुद्याचे ते बोलत नाहीत नाहीत.

दरम्यान, शनिवारी रात्री आठच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील देवगावफाटा, चारठाणा येथे दाखल झाली. रविवारी सायंकाळी जिंतूर शहरात पदयात्रेचे जोरदार स्वागत झाले. जेसीबीच्या साह्याने पदयात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
राज्यसभा सदस्य डॉ.फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, प्रेक्षा भांबळे, अजय गव्हाणे आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व नेते ताकदनिशी मैदानात उतणार आहेत, असे आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितले‌. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटातील बहुतांश आमदार, खासदार आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतील असे दिसून येईल, असेही आमदार रोहित पवार यांनी नमूद केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!