Maratha Reservation : चिकलठाणा पाटीवर रास्ता रोको; गाव बंदीचे बॅनर फाडल्याचा तीव्र निषेध
अज्ञाताविरुध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सेलू जि.परभणी : देवगाव फाटा ते सेलू महामार्गावरील चिकलठाणा पाटी येथे पुढाऱ्यांना गाव बंदीचे लावण्यात आलेले बॅनर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी फोडले. रविवारी सकाळी हा प्रकार समजताच परिसरातील मराठा बांधवांनी एकत्र येत चिकलठाणा पाटीवर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करून निषेध केला. यामुुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, बॅनर फाडल्याच्या प्रकरणी सेलू पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण केले होते. त्यानंतर पुढार्यांना गाव बंदी करत आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश नाही अशा आशयाचे बॅनर तालुक्यातील विविध गावात लावण्यात आले होते. सेलू-देवगाव फाटा महामार्गावरील चिकलठाणा पाटी येथे गाव बंदीचे बॅनर लावण्यात आला होते. परंतु, शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हे बॅनर फाडल्यामुळे संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी अर्धा तास महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. गाव बंदीचे बॅनर फाडल्याचे समजतात चिकलठाणा बुद्रुक, चिकलठाणा खुर्द, रायपूर, सेलू, जवळा जिवाजी व परिसरातील गावातील सकल मराठा समाज बांधव चिकलठाणा पार्टी येथे एकत्र आले होते. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अर्ध्या तासानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रकरणी एकनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.