World Disabilities Day : सेलूचे मुख्याधिकारी दिव्यांग विरोधी : किशोर साळवे यांचा आरोप
सेलूमध्ये दिव्यांग दिन उत्साहात साजरा, मोफत आरोग्य तपासणीला मोठा प्रतिसाद
जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे यांनीही पालिका प्रशासन व मुख्याधिकाऱ्यांच्या दिव्यांग विरोधी धोरणावर कडाडून टिका केली. काकडे म्हणाले, की दिव्यांगाचे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत, या उद्देशाने सामाजिकदृष्ट्या आपण पक्ष, संघटनांच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात पालिका प्रशासन कायम उदासीन आहे. मुख्याधिकारी ढीम्म आहेत. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आगामी काळात दिव्यांगांच्या प्रश्नी नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र लढा उभारू.
सेलू जि.परभणी : सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे कायम दिव्यांगांच्या बाबतीत उदासीन असतात. दिव्यांग दिनानिमित्त आयोजित समारंभात उपस्थितदेखील राहात नाहीत. दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत मुख्याधिकार्यांनी एकदाही सकारात्मक भूमिका दाखविली नाही. मुख्याधिकारी दिव्यांगविरोधी आहेत, असा आरोप संघर्ष दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर साळवे यांनी रविवारी केला.
येथील हुतात्मा स्मारक परिसरात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रविवारी, तीन डिसेंबररोजी आयोजित मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिरामध्ये साळवे बोलत होते. सेलू् येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ, डॉक्टर्स असोसिएशन, संघर्ष दिव्यांग संघटना आणि परभणीच्या सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेजच्या संयुक्त सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोक काकडे यांच्या हस्ते झाले. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ऋतुराज साडेगावकर, पत्रकार संघाचे महंमद इलियास, कांचन कोरडे, लक्ष्मण बागल, किशोर कटारे अबरार बेग ,अशोक उफाडे, माजी नगरसेविका शोभा कोरडे, चिलवंत, जावेद पठाण, अबरार शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती
दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाकडे दिव्यांग भवन उभारण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील १०० दिव्यांगांना घरासाठी जागा उपलब्ध करून देऊन घरकुल मंजूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, नगरपालिका प्रशासन तसेच मुख्याधिकारी कोणाताही प्रतिसाद देत नाहीत. संपूर्ण दिव्यांगांना समाजाच्या व प्रशासनाच्या आधाराची गरज आहे. त्याशिवाय दिव्यांग समाज काहीच करू शकत नाही. सर्वांच्या सहकार्यानेच दिव्यांग समाज उभा राहू शकतो. यासाठी शहरातील पत्रकार संघाने वारंवार दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे यांनी देखील आजपर्यंत दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सर्वांनीच पुढे येऊन दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे, असे किशोर साळवे म्हणाले. शिबिरात 350 दिव्यांगांची तसेच 35 पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांना आळा घालणार : डॉ.ऋतुराज साडेगांवकर
शहरातील दिव्यांगांना वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, यापुढे कुठल्याही दिव्यांगांना बोगस प्रमाणपत्र देण्यात येणार नाही या साठी डॉक्टर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही येथील डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ऋतुराज साडेगांवकर यांनी यावेळी बोलताना दिली आहे. ते म्हणाले की, प्रत्येक विभागात कार्यरत असलेले डॉक्टर संघटनेचे सदस्य यापुढे परिसरातील दिव्यांगांना मोफत आरोग्य तपासणी व मोफत उपचार सेवा देतील. दिव्यांगांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही साडेगावकर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक पत्रकार संघाचे महंमद इलीयास यांनी केले. या वेळी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.राजेंद्र केवारे, डॉ.अरविंद बोराडे, डॉ.अशोक नाईकनवरे, डॉ.आशिष डख, डॉ.अनुराग जोगदंड, डॉ.कैलास आवटे, डॉ.सतीश लिपणे, डॉ.प्रवीण जोग, डॉ.कारके, डॉ.श्रीनिवास मोरे, डॉ.रायते, डॉ. सुदर्शन मालाणी, डॉ.गजमल यांची परभणी येथील सरस्वती डेंटल कॉलेजचे डॉ.अपूर्वा सोनी, डॉ.किरण सोनटक्के, डॉ.सीमा राठोड, डॉ.पल्लवी दाशेडवाड, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्राथमिक स्वरूपात दिव्यांगांना उपयोगी किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, किशोर साळवे यांनी केले. पत्रकार निसार पठाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी डॉक्टर्स असोसिएशन, पत्रकार संघ, डिजीटल मीडिया व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची उपस्थिती होती. शिबिरासाठी शेख मोहसीन, काचंन कोरडे, संजय मुंढे, संतोष गरड, दिलीप मोरे, रामेश्र्वर बहीरट, निरज लोया, राधाकिशन कदम, श्रीपाद कुलकर्णी, रेवणअप्पा साळेगावकर, अबरार बेग, सतीश आकात, निळकंठ पवार, गणेश सवणे, संदीप वरकड, विठ्ठल राऊत, रोहित झोल आदींनी परिश्रम घेतले.