दिव्यांगांसाठी लढा तीव्र करणार : अशोक काकडे
दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिराला सेलूत मोठा प्रतिसाद
सेलू जि.परभणी : दिव्यांगाचे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत, या उद्देशाने सामाजिकदृष्ट्या आपण पक्ष, संघटनांच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात पालिका प्रशासन कायम उदासीन आहे. मुख्याधिकारी ढीम्म आहेत. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आगामी काळात दिव्यांगांच्या प्रश्नी नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र लढा उभारू, असे मत जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे यांनी व्यक्त केले. येथील हुतात्मा स्मारक परिसरात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रविवारी, तीन डिसेंबररोजी आयोजित मोफत दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी काकडे बोलत होते. सेलू् येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ, डॉक्टर्स असोसिएशन, संघर्ष दिव्यांग संघटना आणि परभणीच्या सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेजच्या संयुक्त सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, संघर्ष दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे, डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ऋतुराज साडेगावकर, पत्रकार संघाचे महंमद इलियास, कांचन कोरडे, लक्ष्मण बागल, किशोर कटारे अबरार बेग ,अशोक उफाडे, माजी नगरसेविका शोभा कोरडे, चिलवंत, जावेद पठाण, अबरार शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती
अशोक काकडे म्हणाले की, मागील दिव्यांगदिनानंतर तहसीलदार दिनेश झांपले यांनी दिव्यांगाचे रेशन कार्ड, तसेच वेतनासंदर्भात योग्य ती पावले उचलली. तात्काळ शहरातील सर्व दिव्यांगांना रेशन कार्ड व वेतन देण्याची व्यवस्था केली आहे. अगदी त्याउलट पालिका प्रशासनाकडून दिव्यांगांच्या बाबतीतील सर्व प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करण्यात येते. दिव्यांगदिनी मुख्याधिकारी उपस्थित देखील राहत नाहीत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस दाखवत नाहीत. दिव्यांगांना वेतन देणे तसेच दिव्यांगांना नगरपालिका हद्दीत घरे उपलब्ध करून देणे, त्यांना व्यवसाय करता यावा यासाठी नगरपालिकेच्या हद्दीतील दुकाने उपलब्ध करून देणे यासाठी मुख्याधिकारी कुठलेही सहकार्य करत नाहीत. त्यामुळे शहरातील दिव्यांगांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापुढे नगरपालिका प्रशासनाने तथा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिव्यांगाच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष केले, तर राजकीय व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही तीव्र लढा उभारणार. दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे, अशी ग्वाही अशोक काकडे यांनी दिली.
तहसीलदार दिनेश झांपले म्हणाले की, दिव्यांग हा महत्त्वाचा घटक असूनदेखील कायम दुर्लक्षित घटक आहे. अडचणी भरपूर आहेत. वैयक्तिक, सामाजिक अडचणी आहेत. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, कमीपणाची भावना निर्माण करणारा असतो. मात्र, त्यावर मात करीत दिव्यांगांनी इच्छाशक्ती व जिद्दीने दैनंदिन व्यवहार सुरळीत पार पाडलेले आहेत. दिव्यांगांच्या पालकांनादेखील अडचणीला सामोरे जावे लागते. शासनाने नोकरीमध्ये तीन टक्के आरक्षण दिलेले आहे. त्यासाठी सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. दिव्यांगासाठी विशेष क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शहरातील संघर्ष दिव्यांग संघटना दिव्यांगासाठी लाभदायी संघटना आहे. अध्यक्ष किशोर साळवे दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करतात. त्यामुळे दिव्यांगांनी कायम प्रवाहात राहावे. निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यावा. मतदार नोंदणी व मतदान यासाठी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक पत्रकार संघाचे महंमद इलीयास यांनी केले. या वेळी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.राजेंद्र केवारे, डॉ.अरविंद बोराडे, डॉ.अशोक नाईकनवरे, डॉ.आशिष डख, डॉ.अनुराग जोगदंड, डॉ.कैलास आवटे, डॉ.सतीश लिपणे, डॉ.प्रवीण जोग, डॉ.कारके, डॉ.श्रीनिवास मोरे, डॉ.रायते, डॉ. सुदर्शन मालाणी, डॉ.गजमल यांची परभणी येथील सरस्वती डेंटल कॉलेजचे डॉ.अपूर्वा सोनी, डॉ.किरण सोनटक्के, डॉ.सीमा राठोड, डॉ.पल्लवी दाशेडवाड, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्राथमिक स्वरूपात दिव्यांगांना उपयोगी किटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांगांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, किशोर साळवे यांनी केले. पत्रकार निसार पठाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी डॉक्टर्स असोसिएशन, पत्रकार संघ, डिजीटल मीडिया व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची उपस्थिती होती. शिबिरासाठी शेख मोहसीन, काचंन कोरडे, संजय मुंढे, संतोष गरड, दिलीप मोरे, रामेश्र्वर बहीरट, निरज लोया, राधाकिशन कदम, श्रीपाद कुलकर्णी, रेवणअप्पा साळेगावकर, अबरार बेग, सतीश आकात, निळकंठ पवार, गणेश सवणे, संदीप वरकड, विठ्ठल राऊत, रोहित झोल आदींनी परिश्रम घेतले.
World Disabilities Day : सेलूचे मुख्याधिकारी दिव्यांग विरोधी : किशोर साळवे यांचा आरोप