Yatra Mahotsav : श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव : सेलूमध्ये मंगळवारपासून विविध कार्यक्रम; शेकडो वर्षांची परंपरा 

Yatra Mahotsav : श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सव : सेलूमध्ये मंगळवारपासून विविध कार्यक्रम; शेकडो वर्षांची परंपरा 

सेलू जि.परभणी : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू आणि सेलू (जि.परभणी) शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकूशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सवाला मंगळवारपासून (१९ डिसेंबर) सुरूवात होत आहे. यानिमित्ताने बुधवारपर्यंत (२७ डिसेंबर) दैनंदिन पारंपरिक कार्यक्रमांसह अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत सप्ताह, दररोज रात्री नऊ वाजता कीर्तन, प्रवचन, भजन, पारायण आदी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत.
१९ डिसेंबरपासून सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत नंदकुमार गोंदीकर महाराज श्रीमद् भागवत कथा निरूपण करतील. १९ ते २१ डिसेंबरपर्यंत अनिलबापू महाराज दातार (नाशिक) यांचे कीर्तन आहे. २२ डिसेंबररोजी श्री गीता जयंती व श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ओवीबद्ध चरित्राचे पाठ, श्रीमद् भगवद्गीता पठण, सायंकाळी श्रीआराधना, अभिषेक, महापूजा, रात्री वसंतबुवा मंडलिक यांचे कीर्तन आहे. २३ डिसेंबररोजी छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुवा रामदासी यांचे कीर्तन होईल. २५ डिसेंबरला श्रीमद् भागवत कथेची सांगता व माजी सभापती अशोक काकडे यांच्यावतीने महाप्रसाद आहे. रात्री पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांचे श्रीहरि कीर्तन होईल. कार्यक्रमात सेलूतील महिला व पुरुष भजनी मंडळांचा सहभाग आहे. मृदंगाचार्य दत्तात्रय टोलमारे, तबलावादक सुभाष कुलकर्णी, संवादिनीवर सूर्यकांत बिन्नीवाले तसेच माधव वानरे साथसंगत करीत आहेत. २६ डिसेंबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यानिमित्त महापूजा, महाआरती व व्यापारी मंडळाच्यावतीने श्री साईबाबा मंदिरात पारंपरिक महाप्रसाद भंडारा आहे. दुपारी तीन वाजता श्रींच्या पालखी मिरवणूक सोहळ्याला सुरूवात होणार आहे.  २७ डिसेंबररोजी सुनील महाराज आष्टीकर यांच्या काल्याचे कीर्तनाने उत्सवातील कार्यक्रमांचा समारोप आहे.लघुरूद्र अभिषेक संयोजन सुधीर मंडलिक करीत आहेत. सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान कार्यकारी मंडळ, व्यापारी मंडळ, पूजारी केशव, वामन, पुरुषोत्तम नारायणराव मंडलिक व यात्रा कमिटीने केले आहे.

सेलू शहर श्री साईबाबांचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांची पावन भूमी आहे. महाराजांच्या समाधीपासून पूर्वेकडे तीन फुटांवर स्वयंभू श्री व्यंकटेशांची शंख,चक्र, गदाधारी काळ्याशार पाषाणातील अत्यंत देखणी मूर्ती आढळून आली होती. या प्रतिष्ठापित मूर्तीची पूजाअर्चा शेकडो वर्षांपासून चालते. दर शुक्रवारी मंदिरात पालखी मिरवणूक असते. मार्गशीर्ष शुद्ध पोर्णिमेपासून (श्री दत्त जयंती) पुढे तीन आठवडे यात्रा भरते. यानिमित्त भांडी, कापड, गृहपयोगी वस्तू खरेदीसाठी तसेच विविध मनोरंजक खेळ, आकाश पाळण्यांच्या आनंदासाठी पंचक्रोशीतील महिला, बच्चे कंपनींनी यात्रा फुलून जाते. दर्शनासाठी शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यासह विदर्भ, मराठवाडा व राज्यभरातील भाविकांची मांदियाळी जमते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!