श्रीपंचमुखी गणपतीमुळे सांस्कृतिक वैभव वाढले ; सेलूतील कार्यक्रमात अशोक उपाध्ये यांचे मत
प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात, विविध कार्यक्रम, भाविकांची मोठी उपस्थिती
सेलू जि.परभणी : परभणी जिल्ह्यातील गणपतीची पहिली पंचमुखी मूर्ती सेलूतील सातोना रोडवरील सुनियोजित अशोकनगरमधील भव्य मंदिरात प्रतिष्ठापित झाली आहे. यामुळे सेलू् शहराच्या सांस्कृतिक वैभवात निश्चितच भर पडली आहे, असे मत श्री पंचमुखी पावन गणपती मंदिराचे संचालक अशोक उपाध्ये (छत्रपती संभाजीनगर) यांनी व्यक्त केले. सेलू येथील सातोना रोडवरील एपीयू कन्स्ट्रक्शनच्या सुनियोजित अशोकनगर वसाहतीत पंचमुखी पावन गणपतीची वेद मंत्रोच्चारात विधिवत प्रतिष्ठापना सोमवारी (१८ डिसेंबर) झाली. त्यावेळी उपाध्ये बोलत होते. उमरखेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद महाराजांची प्रमुख उपस्थिती होती. वीणा अशोक उपाध्ये, जया मुकुंद आष्टीकर दाम्पत्यांच्या हस्ते महापूजा, अभिषेक, महाआरती झाली. पैठण येथील दत्तागुरू पोहेकर, उत्तमगुरू सेवनकर, ललितादास दंडे, योगेश चक्रे, प्रसाद सेवनकर, महेश मोहिंदे, सार्थक दिवेकर यांनी पौरोहित्य केले. कार्यक्रमासाठी एकनाथ पावडे, राजू कुलकर्णी, पवन वराडे, बाबासाहेब वाशिंबे, नवनाथ चेडे, सुजित इंगोले, संतोष पावडे आदींनी परिश्रम घेतले.
माळकोळी (जि.नांदेड) येथील समिर पटेल बंधूंनी मंदिराची वास्तू रचना व बांधकाम साकारले आहे. वीस फुटी कळस आहे. प्रतिष्ठापित मूर्तीची उंची, रुंदी व लांबी प्रत्येकी तीन फूट आहे. पूर्वाभिमुख मूर्तीचे स्वरूप काळ्याशार पाषाणामध्येच कायम राहणार आहे.- श्रीनिवास आष्टीकर, संचालक, श्री पंचमुखी पावन गणपती मंदिर, सेलू