यशापेक्षा माणुसकी महत्वाची : सेलूतील नूतन कन्या प्रशालेत लेफ्टनंट संगमेश यांचा सत्कार
सेलू जि.परभणी : ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटीने कसोशीने प्रयत्न करावयास हवे. आपण यशाच्या कितव्या शिखरावर आहोत. यापेक्षा आपण माणूस म्हणून कसे आहोत. या दृष्टिकोनातून यशापेक्षा माणुसकी महत्वाची आहे, असे मत लेफ्टनंट संगमेश मलवडे यांनी मंगळवारी (१९ डिसेंबर) केले.
येथील नूतन कन्या प्रशालेमध्ये आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट संघमेश मलवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल, दत्तराव घोगरे, कैलास मलवडे, शिवानी मलवडे, संगीता खराबे, भालचंद्र गांजापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झालेल्या संगमेश मलवडे यांचा आणि पालक कैलास व शिवानी मलवडे यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार केला.
याप्रसंगी कैलास मलवडे यांनी एनडीएमध्ये मुलींनाही सुवर्णसंधी आहे. विद्यार्थिनींनीही तयारी करावी. या संदर्भात मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी, तर आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले.