परशुराम आर्थिक विकास महामंडळ : पाथरीतील प्रकाश केदारे यांचे उपोषण पाचव्या दिवशी मागे
ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू होते उपोषण
परभणी : ब्राह्मण समाजातील तरुणांच्या आर्थिक उन्नतीकरीता परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने पाथरीमध्ये प्रकाश नागनाथदेव केदारे यांनी शनिवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. बुधवारी,२० डिसेंबर रोजी पाचव्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. परशुराम आर्थिक विकास महामंडळ बाबतीत महाराष्ट्र सरकार अधिकृतपणे परिपत्रक (जीआर) काढणार नाही तोपर्यंत अन्नत्याग करु, असा निर्धार केदारे यांनी जाहीर केला होता. बेमुदत उपोषणाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळाला. राज्यभरातील ब्राह्मण समाज बांधव तसेच लोकप्रतिनिधींनी उपोषण स्थळी भेट दिली. दरम्यान, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे लेखी पत्राद्वारे प्रशासनाने आश्वासन दिले आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतले. मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत विविध पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवणार, असे केदारे यांनी सांगितले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या बैठकीत १४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री मंडळातील सहकारी यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसंदर्भात या मंत्रीमंडळ बैठकीतून घोषणा करू, असे ठोस आश्वासन दिले होते. परंतु, आश्वासन हवेतच विरले. त्यामुळे सर्व ब्राह्मण समाजात तीव्र नाराजीची भावना पसरली, असे मत केदारे यांनी व्यक्त केले. परशुराम आर्थिक विकास महामंडळ बाबतीत महाराष्ट्र सरकार अधिकृतपणे परिपत्रक (जीआर) काढणार नाही तोपर्यंत अन्नत्याग करु, असा निर्धार केदारे यांनी जाहीर केला. प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह बांधून द्यावे, पौरोहीत्य करणाऱ्या ब्राह्मण बांधवांना महिना दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे. वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एक करून पौरोहीत्य करणार्यांच्या नावे करण्यात याव्यात. ब्राह्मण समाजातील थोर पुरुषांवर व ब्राह्मण समाजावर होणाऱ्या खालच्या पातळीवरील टिका व चिखलफेक थांबविण्यासाठी ॲट्रॉसिटी सारखा कडक कायदा करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.