Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या सभेसाठी सर्वस्तरातून मदतीचा ओघ; सेलूसह सोनपेठ, गंगाखेडमध्ये शुक्रवारी सभा
एक हजारावर स्वयंसेवक, पोलिस बंदोबस्तही राहणार चोख
परभणी : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जिल्ह्यात शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी सेलू, सोनपेठ आणि गंगाखेड येथे गाठी-भेटी दौर्याअंतर्गत जाहीर सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाजाच्या जागर फेर्यांनी संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. तीनही सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धार करण्यात आला असून, सर्वचस्तरातील समाज बांधवांनी आपापल्या इच्छाशक्तीनुसार सभेसाठी मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे.
सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या २८ एकर मैदानावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सभा होणार आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. २० बाय ५० चे मुख्य व्यासपीठ, रॅम्प, तसेच महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानावर उंच भगवे ध्वज लावण्यात आले आहे. दरम्यान, याच दिवशी आणखी तीन सभा असल्याने जरांगे पाटील सहाशे जणांच्या ताफ्यासह गुरुवारी रात्रीच सेलू मुक्कामी येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांचे सेलू येथे आगमन होताच ५० जेसीबीतून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सभेला दोन लाख मराठा समाज बांधव उपस्थित राहतील. यादृष्टीने एक हजारावर स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. विविध स्तरातील समाज बांधवांकडून पिण्याच्या पाणी बॉटल, खिचडी स्वरूपात अन्नदान करण्यात येणार आहे. परभणी रोड, सातोना, देवगाव आणि पाथरी या चारही महामार्गावरील मोकळ्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सभास्थळाची पाहणी करून आढावा घेतला. सभेसाठी पोलिस प्रशासनाचा चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे.