Saibaba Bank : बँक कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात; सेलूतील साईबाबा बँकेचा पुढाकार
सेलू जि.परभणी : छत्रपती संभाजीनगर येथील सहनिबंधक सहकारी संस्था प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शनिवारी, २३ डिसेंबर रोजी सेलू तालुक्यातील सहकार क्षेत्रातील विविध बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित स्वयंप्रेरणा मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.
पुणे येथील महाराष्ट्र राज्य सहकारी संघ अंतर्गत सेलूतील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये ही कार्यशाळा झाली. उद्घाटनप्रसंगी साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, वाल्मिकी बँकेचे बाबासाहेब बिडवे, प्रशिक्षक डॉ.संजय औटी, कन्हैयालाल बालचंदानी, ॲड.भगवान शिरसाठ, दत्तात्रय आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ.औटी यांनी सहकारी संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये, निधी व्यवस्थापन, रिजर्व्ह बँकेच्या सूचना, सुरक्षित कर्ज वाटप, दस्तऐवज, नियमावली, आर्थिक पत्रके, आर्थिक साक्षरता, ऑडिट कामकाज, आधुनिक मार्केटिंग तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. प्रा.आर.बी. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रामराव लाडाणे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष हुगे यांनी केले शाखा व्यवस्थापक दत्ता पौळ यांनी आभार मानले.