Surabhi Mahostav : ‘सुरभि महोत्सवा’चे शानदार उद्घाटन; सेलूमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम
श्रीराम प्रतिष्ठानचा सांस्कृतिक उपक्रम
श्रीराम प्रतिष्ठानाने शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या माध्यमातून एक सक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे, अशा शब्दांत आमदार हरिभाऊ लहाने यांनी डॉ.रोडगे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
सेलू जि.परभणी : सेलू् येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या सुरभि महोत्सवाचे उद्घाटन रविवारी, २४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. महोत्सवामध्ये २९ डिसेंबरपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे परभणी लोकसभा समन्वयक तथा माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. ध्वज फडकाविण्यात आला. स्पोर्टस डे निमित्त मशाल प्रज्वलित करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, डॉ. सविता रोडगे, भारतीय जनता पक्षाचे सुरेश भुमरे, राजेश देशमुख, लेफ्टनंट संगमेश मलवडे, प्रा.महादेव साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी प्रतिष्ठानाच्या विविध घटक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलनाने सर्वांचे लक्ष वेधले चिमुकल्यांच्या क्रीडा प्रात्यक्षिकांनी तसेच नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी लेफ्टनंट संगमेश मलवडे यांचा सत्कार करण्यात आला. श्रीराम प्रतिष्ठानाने शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या माध्यमातून एक सक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे, अशा शब्दांत आमदार हरिभाऊ लहाने यांनी डॉ.रोडगे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
सुरभि महोत्सवात २६ डिसेंबररोजी ‘फोक डान्स ऑफ इंडिया’, २७ डिसेंबरला ‘ट्रान्झिशन : अ चेंज इन वर्ल्ड ” तर २८ डिसेंबरला “ रंग मराठी मातीचा ” आणि शिवपुत्र संभाजी महानाट्य सादर होणार आहे. २९ डिसेंबरला ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम आहे. सेलूकरांनी महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ.संजय रोडगे यांनी केले आहे. उद्घाटनप्रसंगी डॉ.रवींद्र घोडके, डॉ.प्रतापसिंह शिंदे, अर्जुन बोरुळ, कैलास मलवडे, प्राचार्य अशोक बोडखे, डॉ.मीनाक्षी रत्नपारखी, डॉ.नीलिमा सिंग प्रा. डॉ.बबन सोनवणे आदींसह विद्यार्थी, पालकांची मोठी उपस्थिती दिसून आली.