Shri Geeta Jayanti : श्री गीता जयंतीनिमित्त सेलूमध्ये सत्संग सोहळा उत्साहात
श्रीसंत विजय राधेश्याम महाराज परिवाराचा पुढाकार ; शोभायात्रेने वेधले लक्ष
सेलू जि.परभणी : वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील श्रीसंत विजय राधेश्याम महाराज परिवाराच्या वतीने तीन दिवस श्री विश्वजीवन ग्रंथ, श्रीमद् भगवद्गीता पारायण, प्रवचन, कीर्तन व सत्संग सोहळा आदी कार्यक्रमांनी गीता जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवाचे हे अकरावे वर्ष होते. शिष्यगण व भोई समाजाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने परभणी रस्त्यावरील श्री अष्टविनायक नगरमध्ये २२ ते २४ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी गीता जंयतीनिमित्त श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून सकाळी बँडपथकांसह शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी फुगड्या खेळत आनंद घेतला. प्रारंभी श्री विश्वजीवन ग्रंथ, श्रीमद् भगवद्गीता ग्रंथाचे पूजन झाले. रथामध्ये अनसिंग (जि.वाशिम) येथील श्रीसंत विजय राधेश्याम महाराज यांची उपस्थिती होती. विश्व मंदिर संस्थानचे सचिव गोवर्धन महाराज राऊत, रामदास महाराज महाले, भारत कुकडे, सुनील कुकडे, लक्ष्मण कुकडे, रामभाऊ कुकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. दुपारी विजय राधेश्याम महाराज यांचे प्रवचन झाले. रात्री आठ वाजता भागवताचार्य मारोती महाराज दागंट यांच्या हरी कीर्तनाला श्रोत्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. २४ डिसेंबर रोजी भगवान महाराज बोरूळ यांचे काल्याचे कीर्तन झाले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली. कलाबाई कुकडे, सुलाबाई लोखंडे, दीपक कुकडे, गजानन कुकडे, मनोज कुकडे आदींसह प्रकाश लांडगे, सखाराम आडणे, सुभाष ढवळे, उद्धव शहाणे, बालू सहातोंडे, राम लोखंडे व समस्त भोई समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.