चारठाणकर संगीत महोत्सव : सेलूमध्ये शनिवारपासून संगीत संमेलन; प्रतिथयश युवा कलावंतांचा सहभाग
सेलू : येथील संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर स्मृती संगीत महोत्सावांतर्गत शनिवारी व रविवारी ( ३० व ३१ डिसेंबर) साईनाट्य मंदिरात संगीत संमेलन आयोजिण्यात आले असून प्रतिथयश युवा कलावंतासह स्थानिक कलाकार यामध्ये हजेरी लावणार आहेत.
बुधवारी नूतन विद्यालयाच्या सभागृहात संयोजन समितीची बैठक प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ३० डिसेंबर रोजी उद्घाटन आहे. या सत्रात देगलूर येथील ऐनोद्दिनवारसी यांचे बासरी वादन होईल. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील महागामी गुरुकूल मधील नृत्यगुरु पार्वती दत्ता यांच्या शिष्या ओडीसीनृत्य सादर करतील. विश्वनाथ दाशरथे (छत्रपती संभाजीनगर) यांचे शास्त्रीय गायन होईल.
३१ डिसेंबररोजी दुपारी एक ते चार वाजेपर्यंत स्थानिक कलावंत हजेरी लावणार आहेत. यामध्ये पूजा तोडकर,सीमा दडके,शंतनू पाठक, सच्चिदानंद डाखोरे,यशवंत चारठाणकर यांचे गायन आहे.
सायंकाळच्या सत्रात पांडुरंग पवार (पुणे) यांचे तबला सोलो वादन, त्यानंतर हेमांगी नेने (हैदराबाद) यांचे गायन होईल. ख्यातकीर्त गायक कृष्णेद्र वाडीकर यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल. शांतीभुषण चारठाणकर,सागर पाटोकर, यश खडके, गजानन धुमाळ हे वादक कलावंत संगीतमहोत्सवात साथसंगत करणार आहेत, अशी माहिती समन्वयक महेश खारकर, मोहन खापरखुंटीकर, अजित मंडलिक यांनी दिली.