मतदार जनजागृती मोहीम : एसडीओ मेघना यांचा थेट मतदारांशी संवाद; आहेर बोरगावमध्ये कार्यक्रम
सेलू जि.परभणी : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनबाबत मतदार जनजागृती मोहीम जिल्हाभर सुरू आहे. या अंतर्गत सेलूच्या उपविभागीय अधिकारी मेघना कवली यांनी गुरुवारी, २८ डिसेंबर रोजी सेलू् तालुक्यातील आहेर बोरगावमध्ये मतदारांशी अभिरूप मतदान करून थेट संवाद साधला. नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने मास्टर ट्रेनर डॉ.संतोष मलसटवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. अभिरूप मतदान केंद्रावर मतदारांनी स्वतः मतदान करून शंका तसेच येणाऱ्या समस्याचे समाधान मास्टर ट्रेनरमार्फत करून घ्यावे. १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मेघना कवली यांनी या वेळी केले. नितीन माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच नवमतदारांनाही मेघना यांनी मतदान प्रक्रिया समजून सांगितली. लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदारांची भूमिका महत्वपूर्ण आहे, असे लहाने यांनी नमूद केले. मास्टर ट्रेनर यादव नारायणकर, अमोल गिरी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सोळंके यांनी केले.