दामिनी पथकाच्या अस्मिता मोरे यांचा सन्मान; सेलूत सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात
सेलू, प्रतिनिधी, दि.३ : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त सेलू येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने सेलू पोलीस स्टेशनच्या दामिनी पथक प्रमुख अस्मिता मोरे यांचा सावित्रीमाईंची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मोरे म्हणाल्या की; सावित्रीमाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करून मुलींना शिक्षण प्रवाहात आणले व त्यांचे जीवनमान बदलले. त्यांच्या या कार्याचा वसा महिलांनी व युतीने पुढे न्यावा. अध्यक्षस्थानी समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांची उपस्थिती. होती. प्रमुख पाहुणे म्हणून बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कौसडीचे सरपंच मोबीन कुरेशी, भाजपा सेलू शहराध्यक्ष अशोक अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक उफाडे, दिलावर शेख यांची उपस्थिती होती.
नानासाहेब राऊत यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की; जसे महात्मा फुलेंनी सावित्रीमाई फुले यांना पुढे करून महिला शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्याचप्रमाणे आपल्या समाजाने देखील प्रत्येक ठिकाणी महिलांना पुढे करून त्यांना न्याय देण्याचे काम करावे व सावित्रीमाई फुले यांचे कार्य घराघरात पोहोचण्याचे काम करावे. सूत्रसंचालन किशोर कटारे यांनी केले. आभार प्रभाकर इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड.प्रभाकर गिराम, भुजंग थोरे, विठ्ठल कोकर, महादेव गायके, सचिन कोरडे, कुराडकर, उल्हास नाईकनवरे, पंडितराव जगाडे, पाडुरंग वाढवे, पंडित रासवे , तरासे पाटील, रवी दळवे, सुदर्शन कटारे, प्रकाश चव्हाण, कार्तिक श्रावणे, प्रथमेश इंगळे, राजेभाऊ मोगरे, तहेसीन देशमुख, कविता कटारे, उर्मिला इंगळे मनकार्णा रासवे यांची उपस्थिती होती.