सेलूतील ‘नूतन’ च्या समूहनृत्यांनी उडविली धम्माल
विविध गुणदर्शनाला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद
सेलू/परभणी : येथील नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त गुरुवारी, ४ जानेवारी रोजी आयोजित समूह नृत्य स्पर्धेत बाल कलावंतांनी एकाहून एक सरस नृत्य सादर करून धम्माल उडवून दिली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
547
प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी पर्यवेक्षक किरण देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, आरती पांडव, उज्ज्वला लड्डा, परसराम कपाटे, गणेश माळवे, काशीनाथ पल्लेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी माऊलीचा गजर, अंबाबाई गोंधळा ये, मॉं तुझे सलाम, ऐ मेरे वतन के लोग, आमच्या पप्पांनी गणपती आणला, दैवत छत्रपती… आदी एकाहून एक सरस गीतांवर समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अक्षरा बोकन या विद्यार्थीनीने सांताक्लॉजची भूमिका उत्कृष्टरित्या सादर करून स्पर्धेत रंग भरला. या वेळी उपस्थित पालकांना भेट वस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. परीक्षक म्हणून संध्या फुलपगार, वर्षा कदम, शिल्पा बरडे, सुनीता दहिफळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संयोजक आरती कदम, आश्विनी पटाईत यांनी केले. दरम्यान, लक्ष्मण वांगे, सुनील तोडकर, वीरेश कडगे यांच्या संयोजनात अभिरूप वेशभूषा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. समूह गीत स्पर्धेत देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. सच्चिदानंद डाखोरे, शैलजा कवुटकर, ए.आर.कांबळे यांनी संयोजन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांची मोठी उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.