उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे परभणीमध्ये वितरण
परभणी : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी तीन जानेवारी रोजी ११ शिक्षकांना उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी आदर्श शाळा पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, डॉ.महेश जोशी, प्राचार्य अनिल मुरकुटे, परीक्षा मंडळाच्या सचिव वैशाली जामदार, प्रिया राणी पाटील, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, माधव सलगर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘माझी शाळा-सुंदर शाळा’ हा अभिनव उपक्रम असून सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. या वेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश ढवारे, छाया गायकवाड, प्रेमेन्द्र भावसार, डॉ. संतोष सेलूकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मो.जावेद खान अब्दुल रहमान खान, महादेव खुडे, सुप्रिया श्रीमाळी, ज्ञानेश्वर निपाणीकर, मारोती डोईफोडे, शरद ठाकर, माणिक पुरी, सतीश जाधव, संतोष चाफळे, सुमित लांडे, प्रशांत सोनवणे या शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.