दर्पण दिन : पत्रकारांच्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे; महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद
मोफत आरोग्य सुविधा, पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावू : आमदार डॉ.राहुल पाटील;
परभणी/प्रतिनिधी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या पत्रकारांचे विविध प्रश्न असून जिल्हास्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी,वेब पत्रकार व छायाचित्रकार यांच्या कुटुंबियांसाठी आर.पी. हॉस्पीटल व रिसर्च सेंटर व व्हॉईस ऑफ मिडीया संघटना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिना निमित्त महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिर शुक्रवारी (दि.५) परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील आर.पी.हॉस्पिटल (परभणी मेडीकल कॉलेज) येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री.गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार डॉ.राहुल पाटील होते. व्यासपीठावर पोलिस अधीक्षक रागसुधा आर.,परभणी मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाह सुरज कदम, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, उपाध्यक्ष विशाल माने, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, प्रवीण चौधरी, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत कुलकर्णी, प्रवीण देशपांडे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, शिवसेना माजी शहरप्रमुख अनिल डहाळे, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, करण पाटील, वाजीद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गावडे म्हणाले, आरोग्याबाबत सर्वांनी सकारात्मक राहिले पाहिजे. विशेषत: पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.आ.पाटील आणि व्हॉईस ऑफ मीडिया चे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात बोलतांना जिल्हाधिकारी गावडे म्हणाले, पत्रकारांच्या घराचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यासाठी आपण लवकरच संयुक्त बैठक घेऊन पत्रकारांना घरासाठी जागा कशा पद्धतीने देता येईल यावर सकारात्मक निर्णय घेऊ तसेच भवन साठी देखील जागा देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ गावडे यांनी यावेळी सांगितले
आ.डॉ.पाटील यांनी आपल्या भाषणात व्हॉईस ऑफ मीडियाच्या वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत ही संघटना सामाजिक प्रश्नावर चांगले काम करीत असल्याचे सांगितले. मात्र पत्रकारांना कुठलीही सुरक्षितता नाही, त्यांना कुठेतरी मदतीचा हात मिळाला पाहिजे, सुरक्षितता मिळाली पाहिजे. पत्रकारांसाठी दरवर्षी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्याबरोबरच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य कार्ड देवून वर्षभर सर्व तपासण्या व उपचार मोफत करण्यात येतील, अशी घोषणा देखील आ. पाटील यांनी यावेळी केली. पत्रकार भवनासाठी आपण 50 लाखाचा निधी देणार असून यापूर्वीच याची घोषणा केलेली आहे. त्या कार्यक्रमाला मनपा आयुक्त देखील होत्या, परंतु त्याबाबत त्यांच्याकडून अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसून जागा देखील निश्चित झालेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांनी मनपा प्रशासनासोबत बैठक घेवून चांगली जागा उपलब्ध करून द्यावी. पत्रकारांच्या घरांसाठी महसूल प्रशासनाने 5 एकर जागा दिल्यास चांगली हाउसिंग सोसायटी देखील उभी राहू शकेल. जिल्हा कचेरीत पत्रकार कक्ष स्थापन करावा,असेही ते म्हणाले. लोकप्रतिनिधी, अधिकारी म्हणून आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, ती वाया घालवता कामा नये असे आ. पाटील यांनी यावेळी सांगितले. पोलिस अधीक्षक रागसुधा आर म्हणाल्या की, पोलिस आणि पत्रकार यांच्या कामात खूप साम्य असल्याचे सांगून त्यांनी वर्षातून एकदा स्वतःची व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया च्या वतीने गणेश पाटील, शेख गौसोद्दीन शहाबोद्दीन, सोमनाथ स्वामी, आनंद ढोणे, लक्ष्मण उजागरे यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी केले. विवेक नावंदर,विजय चोरडिया, सूरज कदम, यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गणेश पाटील तर आभार प्रदर्शन कैलास चव्हाण यांनी केले.
महाआरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महा आरोग्य तपासणी शिबिराची सुरूवात सकाळी ७ वाजल्यापासून झाली. पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रथमच तपासणी व उपचार अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिरात 392 पत्रकार, इलेट्रॉनिक्स मिडीया प्रतिनिधी, वेब पत्रकार, छायाचित्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या.