Financial Literacy : आर्थिक साक्षरता काळाची गरज : अतुल दातार; सेलूतील ज्ञानतीर्थ, प्रॉस्पेरस पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रम
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रॉस्पेरस पब्लिक सेलू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता या विषयावर सेलू स्टेट बँक ऑफ इंडियाचे रोखपाल प्रमुख अतुल दातार यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता या विषयाचे ज्ञान असावे व व्यवहार ज्ञान व्हावे. भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन ,त्याचा योग्य वापर , शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा,खाते काढणे ,युनो या ॲप चा वापर आदी विषयी दातार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आर्थिक साक्षरता उज्ज्वल भवितव्यासाठी काळाची गरज आहे . बँकेत खाते उघडणे, बचत करण्याची पद्धत, कर्जाचे व्यवहार, करांमधील बचत, गृहकर्ज, विमा प्रीमियम, गुंतवणुकीतील परतावा, भाग (शेअर्स) खरेदी, लाभांश, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, विद्युतीय आधुनिक उपकरणांचा वापर, पंजीकृत संस्थेतील गुंतवणूक इत्यादींबाबत माहितीचा समावेश आर्थिक साक्षरतेत होतो. आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने शाळेत विद्यार्थ्यांना पैशाचे नियोजन कसे करावे , कशाप्रकारे गुंतवणूक असते , बँकाचे व्यवहार, कर्जाची पद्धत कशी असते या संदर्भात अतुल दातार यांनी माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रसंगी मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, शिक्षकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले.
ज्ञानतीर्थ विद्यालयात व्याख्यान
सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.
या कार्यक्रम प्रसंगी मुख्य मार्गदर्शक सेलू स्टेट बँक ऑफ इंडियाचे रोकड प्रमुख अतुल दातार, मुख्याध्यापिका शालिनी शेळके, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे, नारायण चौरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिगंबर टाके यांनी केले.