महायुतीचा खासदार निवडून आणणार; परभणी जिल्हा समन्वय महामेळाव्यात नेत्यांचा निर्धार
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा खासदार निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या जिल्हास्तरीय समन्वय मेळाव्यात रविवारी (१४ जानेवारी) विविध घटक पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला. शहरातील पाथरी रोडवरील श्री रेणुका मंगल कार्यालयात हा मेळावा आयोजिण्यात आला होता.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व लोकसभा प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हा समन्वयक भाजपच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, डॉ.मधुसूदन केंद्रे, मोहन फड, राजेश विटेकर, विजयराव वरपूडकर, आनंदराव भरोसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी परभणी जिल्हा देखील मागे राहणार नाही. आमदार दुर्राणी यांनी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी तनमनाने ही महायुती स्वीकारलेली असून कोणत्याही घटक पक्षाचा महायुतीने दिलेला उमेदवार विजयी करण्याचा दृढ विश्वास यानिमित्ताने बोलून दाखविला. राजेश विटेकर यांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महायुतीमध्ये मोठ्या विश्वासाने सामील झाले असून येणार्या काळात तरुणांना सोबत घेऊन लोकसभेतील उमेदवारास निवडून आणण्याचे यावेळी सांगितले.
माजी आमदार लहाने यांनी जिल्ह्यातील एकही शिवसैनिक घरात न बसता रस्त्यावर उतरून खासदार निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. माजी आमदार बोर्डीकर म्हणाले की, देशांमध्ये गोरगरीब जनतेसाठी मोदी सरकारने राबविलेल्या योजना कार्यकर्त्यांनी घरोघरी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करावे. तसेच जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना येणार्या प्रत्येक निवडणुका महायुतीच्या विचारानेच लढून उमेदवारास प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास देखील या निमित्ताने द्यावा, असे सांगितले. प्रताप देशमुख, संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, व्यंकटराव शिंदे, माधवराव कदम, एन.डी.दाभाडे, मधुकर अवचार, डॉ.सुभाष कदम, उमेश देशमुख, विलास बाबर, चंद्रकांत राठोड, दशरथ सूर्यवंशी, साहेब भोसले, अनिल नखाते, विठ्ठल रबदडे, व्यंकटराव तांदळे, विद्या चौधरी, सुरेश भुमरे, भागवत बाजगीर, रोहन सामाले, किरण तळेकर, संतोष देशमुख यांच्यासह महायुतीचे जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.