Learning To Learn : भविष्यवेधी शिक्षणासाठी सज्ज व्हावे; सेलूतील शिक्षक प्रशिक्षणाचा उत्साहात समारोप
कुलनिहाय पद्धतीने उर्मी देणारे प्रशिक्षण; पाच फेब्रुवारीपासून पाचवा टप्पा
परभणी जिल्ह्यातील सर्वच नऊ तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. पहिली ते आठवीच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक स्तरावरील एकूण ८,२८७ पैकी चार टप्प्यांत ६,२९० शिक्षकांचे प्रशिक्षण २० जानेवारीपर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित शिक्षकांना पाच ते नऊ फेब्रुवारीपर्यंत पाचव्या टप्प्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. या आधीच्या प्रशिक्षणापेक्षा अधिक उर्मी देणारे प्रशिक्षण असल्याच्या शिक्षकांच्या भावना आहेत. – अनिल मुरकुटे, वरिष्ठ अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक, डाएट, परभणी
सेलू जि.परभणी : एकविसाव्या शतकातील कौशल्य विकासाचे आव्हाने पेलण्यासाठी मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आणि स्वपातळीसह स्व-समाज, भौतिक सुविधा स्व-प्रशासनाच्या सहभागाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी शिक्षकांनी सज्ज व्हावे, असा सकारात्मक सूर शिक्षक प्रशिक्षणातील चर्चेतून निघत आहे. पहिली ते आठवीच्या शिक्षकांना १२ डिसेंबरपासून ‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन’ या विषयावर तालुकास्तरीय प्रशिक्षण ठिकठिकाणी सुरू आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.विकास सलगर, वरिष्ठ अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक अनिल मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या संनियंत्रणात कुलनिहाय पद्धतीने शिक्षकांना प्रशिक्षणाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार २०२७ पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत भाषिक आणि अंकीय साक्षरता प्राप्त होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोबतच अध्ययन, साक्षरता आणि जीवन कौशल्यांची पुनर्मांडणी करण्यात आली आहे. प्रशिक्षणामध्ये राज्य प्रशिक्षक नीलेश घुगे यांचे ‘आव्हान पुस्तिके’तील घटकांवरील मार्गदर्शक व्हिडिओंचा प्रभाव दिसून आला. जागतिक नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, संप्रेषण, सर्जनशीलता, सहयोग या अध्ययन कौशल्यांसोबत माहिती-तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, तंत्रज्ञान साक्षरता, सामाजिक आणि जीवन कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. यासाठी आनंददायी अनुभव देणारे प्रशिक्षण ठरले आहे. मार्गदर्शन, श्रवण, चिंतन, आव्हान पुस्तिका लेखन, चर्चा, मतमतांतरे आदींमुळे प्रशिक्षणात जिवंतपणा आढळला. नियोजन, भोजन व्यवस्था उत्तम होती. – कैलास मलवडे, प्रशिक्षणार्थी, सेलू जि.परभणी
♦ सेलूतील प्रशिक्षणाचा समारोप
सेलू येथील बोर्डीकर पोदार लर्न्स इंग्लिश स्कूलमध्ये चार टप्प्यांत ६१५ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. शनिवारी, २० जानेवारी रोजी चौथ्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा समारोप झाला. यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) संजय ससाणे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ससाणे म्हणाले, ” ज्ञानरचनावाद ही शिक्षण प्रणाली नाही, तर एक जीवन प्रणाली आहे. मूल स्वतःहून शिकणे हा प्रशिक्षणाचा मूळ पाया. या दृष्टीने शिक्षकांनी स्वपातळीवर गरजेनुसार विद्यार्थ्यांना आव्हाने देऊन स्वयंप्रेरणेने शिकण्यासाठी जाणीवपूर्वक साहाय्य करावे.”
समन्वयक तथा सुलभक सुनिता काळे, सुधाकर कटारे, बबन राठोड, नीलेश पांचाळ, शिवाजी पिंपळकर, संदीप सूर्यवंशी, संतोष मगर, सुमिता सबनीस, उदयपाल सोनकांबळे आदींनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. अंजली पद्माकर, अरुण राऊत, जनार्दन कदम, मनोज देगावकर, अश्विनी आमले, दत्ता काळे आदींसह शिक्षक उपस्थित होते.