जय श्रीरामांच्या जयघोषात आनंदोत्सव; सामुदायिक महाआरतीला भाविकांची मोठी उपस्थिती
जिंतूरमध्ये शोभायात्रा, ठिकठिकाणी भाविकांची मोठी उपस्थिती,
परभणी : अयोध्या धाम येथील प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परभणी शहर, सेलू, जिंतूर, पाथरी, गंगाखेडसह जिल्ह्यातील गावोगावी सोमवारी जय श्रीरामच्या जयघोषात सामुदायिक महाआरती, दीपोत्सव, रंगबिरंगी आतषबाजीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
श्रीराम नामजप, हनुमान चालीसा पठणासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. सेलू येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात प्रभु श्रीरामांच्या भव्य प्रतिमेसमोर सायंकाळी साडेसात वाजता सामुदायिक महाआरती, रंगबिरंगी आतषबाजी झाली. या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, प्राचार्य डी.आर.कुलकर्णी, माजी आमदार हरिभाऊ लहाने, डॉ.संजय रोडगे, ॲड.दत्तराव कदम, अशोक अंभोरे, लोकप्रतिनिधी मान्यवरांसह रामभक्तांची मोठी उपस्थिती होती. श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर, महेशनगरातील श्री साईबाबा मंदिरात महाआरती, दीपोत्सव साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुकेश बोराडे, राजेंद्र पवार, प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे यांच्यासह भाविकांची मोठी उपस्थिती होती. ब्राह्मणगल्लीतील प्राचीन श्रीराम मंदिर दुपारी महाआरती झाली. जिंतूर येथील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव समिती आणि रामभक्तांच्या वतीने शहरातून श्रीरामांच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. श्रीराम मंदिरातील महाआरतीमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. वालूर येथील वाल्मिकेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम झाले.