NEP-2020 : नविन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची भूमिका महत्वाची : डॉ.राजेंद्रकुमार तातेड; सेलूतील नूतन महाविद्यालयात शिक्षक कार्यशाळा उत्साहात 

NEP-2020 : नविन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची भूमिका महत्वाची : डॉ.राजेंद्रकुमार तातेड; सेलूतील नूतन महाविद्यालयात शिक्षक कार्यशाळा उत्साहात 

सेलू जि.परभणी : शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी, पालक, संस्था व्यवस्थापन, शिक्षक व सरकार या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. आमच्यात बदल घडविण्याची निश्चित्तच ताकद आहे. या क्षमतेची ओळख आम्हाला नवीन शैक्षणिक धोरणामुळे होणार आहे, असे मत डॉ.राजेंद्रकुमार तातेड यांनी व्यक्त केले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी सचिव तथा नूतन महाविदयालयाचे माजी प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांच्या अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘नवीन शैक्षणिक धोरण-२०२०: संधी आणि आव्हाने’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस. एम.लोया हे होते. व्यासपीठावर उद्घाटक डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य दत्तराव नाना पावडे, डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ उत्तम राठोड, पर्यवेक्षक प्रा.जी.एस.सोनवणे, प्रा.दयानंद जामगे यांची उपस्थिती होती.
डॉ.तातेड म्हणाले की; शिक्षणाचा मूळ उद्देश हा मानवी मूल्यांची ओळख करून देणे हा असून, हा भाग नवीन शैक्षणिक धोरणात अंतर्भूत आहे. विद्यार्थ्यांना कुशल आणि एक माणूस म्हणून घडवण्यात शिक्षकांची, समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. या शैक्षणिक धोरणामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली, यावेळी नूतन शिक्षण संस्था व संस्थेच्या इतर घटक संस्थेच्या वतीने डॉ. द.रा.कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य द.रा.कुलकर्णी सरांनी सत्काराला उत्तर देतांना आपल्या आजवरच्या आयुष्याचे तीन टप्पे सांगून या९१ वर्षाचे सिंहावलोकन केले. प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्‌घाटक म्हणून संस्थेचे सचिव डॉ.व्ही.के.कोठेकर यांनी पूर्वप्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया असून त्याची नव्या शैक्षणिक धोरणात गांभीर्याने अंमलबजावणी होईल. या धोरणाचा अभ्यास व प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी सजग असले पाहिजे ,असे प्रतिपादन केले. डॉ.मोहन काटकर यांनी अतिथींचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजाराम झोडगे यांनी तर आभार गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ.निर्मला पद्‌मावत यांनी मानले.

शिक्षक कार्यशाळा उत्साहात

दुपारच्या सत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० यावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजत करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते. व्यासपीठावर सचिव डॉ.व्ही.के.कोठेकर, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य दत्तरावनाना पावडे, डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, पर्यवेक्षक प्रा.जी.एस.सोनवणे, प्रा.दयानंद जामगे यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ.तातेड यांनी पीपीटी प्रेझेंटेशनव्दारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर अधिक भर दिला असून शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. जागतिक स्तरावर विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी विविध बारा कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे असे नमूद केले. या वेळी दत्तराव पावडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.लोया यांनी समारोप केला. सूत्रसंचालन प्रा.हडसनकर यांनी केले. कार्यशाळेला नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील विविध घटक संस्थांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक तसेच तालुक्यातील शिक्षकांनी मोठी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!