डॉ.गुलाम रसूल संगीत संमेलनाला परभणीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; गायन, वादन, नृत्य, तालसंकिर्तनामध्ये श्रोते दंग
परभणी : येथील दोन दिवसीय उस्ताद डॉ.गुलाम रसूल संगीत संमेलनाला परभणीकर रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मिळाला.गायन, वादन, नृत्य, तालसंकिर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी, २८ जानेवारी संमेलनाला सुरुवात झाली. उद्घाटनप्रसंगी भाजपा जिल्हा संघटक बाबासाहेब जामगे, उद्योजक महेश खारकर, डॉ.रविंद्र मानवतकर, सुहासराव बीडकर, मल्हारीकांत देशमुख आदींची उपस्थिती होती. पहिल्या दिवशीच्या संगीत संमेलनाची सांगता निरंजन लांडे (अकोला) यांच्या गायनाने झाली. अकोल्याच्या या गायकास साथसंगत करणार्या त्यांच्या गाववाल्याने स्टेजवर ‘दरबारीकानडा’ गाण्याची ऐनवेळी केलेली फर्माईश गायकाने पूर्ण केली. हळूवार बागेश्री नंतरचा जोरकस दरबारी अप्रतिम होता. दोन तासांच्या प्रस्तुतीकरणात गायकाने आपल्या नजाकतदार, जोशपूर्ण प्रस्तुतीकरणाने रसिकांची मने जिंकली. सुरूवातीला निरंजन यांनी अतिशय रंजकतेने बागेश्री मांडला. तिन्ही सप्तकात लिलया फिरणारा आवाज त्या जोडीला आकर्षक सरगम, तानबाजीमुळे त्यांचे गायन रंगत गेले. पंडित अजय पोहनकर यांचे शिष्य असलेल्या या कलावंताचे गायन ऐकताना गुरूंच्या गाण्याचा अभास होत होता.त्यांना साथसंगत करणारे शांतीभुषण चारठाणकर (हार्मोनियम), पवन सिडाम (तबला) यांच्या वादनाने मैफिलीत अधिकच रंग भरला. ‘याद पियाकी आये’ या सर्वश्रृत ठुमरीत तबलावादक पवन सेडाम याने आपल्या वादातील कौशल्य पणाला लावत लग्गयांची एकामागून एक लड लावित रसिकांना बेहद खुष केले.
♦‘मधुकंस’, कथ्थकला श्रोत्यांची दाद
उद्घाटनानंतरची पहिली मैफल डॉ.गुलाम रसूल यांची शिष्या शिल्पा बीडकर-सेवलीकर (ठाणे) यांची झाली. त्यांनी राग मधुकंस प्रस्तुत केला. ‘संत कबीरदासांचे’ मोपे साई ने रंग डाला’ भक्तिगीत व प्रभुरामचंद्र भजन गावून त्यांनी सेवा संपविली. हार्मोनियमवर मंगेश जवळेकर, तर तबलासंगत विशाल धानोरकर यांची होती. छत्रपती संभाजीनगर येथील महागामी गुरूकुलच्या विद्यार्थीनीने कथ्थक शास्त्रीय नृत्य सादर करून रसिकांना संमोहित केले. प्रारंभी ललितकला भुवनच्या विद्यार्थीवृंदाने शारदा स्तवन सादर केले. सूत्रसंचालन श्रृती औंढेकर यांनी केले.
♦तालसंकिर्तनामध्ये रसिकश्रोते दंग
डॉ.गुलामरसूल संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (२९ जानेवारी० कार्यक्रमाची सुरूवात तालसंकिर्तन या अनोख्या उपक्रमाने झाली.
प्रसिद्ध तबलावादक डॉ.प्रशांत जोशी-सावरगांवकर व त्यांच्या पाच शिष्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात श्रोते दंग झाले होते.
डॉ.जोशी व शिष्यांनी सुरूवातीला घेतलेली तिन तालातील उठान रोमांचित करणारी होती. त्यानंतर पेशकार, कायदा चक्राधार सादर करण्यात आला. उस्ताद झाकीर हुसेन, योगेश सामसी, सतिशचंद्र चौधरींची रचना प्रस्तुत केली. प्रत्येक वादक वेगवेगळा कायदा सादर करीत दाद मिळवित होता. मोहन मोहनपूरीकर, विशाल धानोरकर, मयूर काकडे, संकेत शार्दुल, प्रद्युम्न जोशी या शिष्यगणांनी आपापली चुणूक दाखविली. लेहरा संगत मंगेश जवळेकर यांची होती.
♦संगीत मिश्रांच्या सारंगीचीआर्तता
ताल संकिर्तनामुळे हलका-फुलका बसलेला माहौल संगीत मिश्रांच्या सारंगी वादनाने गंभीर बणत गेला. वादनासाठी त्यांनी निवडलेल्या पुरिया कल्याण सारख्या रागामुळे तर सारंगीची आर्तता अधिकच गडद होत मनाला भिडत होती. मिश्राजींना समर्थ तबला संगत हनुमंत फडतरे यांची होती. प्रारंभी कलावंतांचे स्वागत रत्नाकर अपस्तंभ, डॉ.विलास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर श्री.शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, जिल्हा ग्राहक मंचचे डॉ.विलास मोरे, कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संगीता अवचार, नांदेड येथील जेष्ठ गायक रत्नाकर अपस्तंभ, गंगाधर कान्हेकर यांची उपस्थिती होती.