सेलूतील नूतन विद्यालयात ‘लोकशाही उत्सव’; विद्यार्थी संसद प्रतिनिधी निवडणूक उत्साहात
परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत मंगळवारी (३० जानेवारी) ‘लोकशाही उत्सव’ साजरा करण्यात आला. यामध्ये ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट तसेच मतपत्रिका अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थी संसद अभिरूप निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी अभिरूप मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक शरद ठाकर, हेमांशी ईश्वर जैन यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार विजय मोरे, सेलू बाजार समितीचे संचालक तथा भाजप तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, मनीष कदम, एच.जी.बुचाले, डी.डी.सोन्नेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी ॲड.दत्तराव कदम म्हणाले की, मतदार जागृती आणि मतदान साक्षरता या दृष्टीने नूतन शाळेचा उपक्रम आदर्श आहे. प्रतीक ठाकर याने मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बाबासाहेब हेलसकर यांनी केले. सूत्रसंचालन गोपाळ आम्ले यांनी केले. वर्षा कदम यांनी आभार मानले. उपक्रमासाठी किरण देशपांडे, नारायण सोळंके, एस.एस.पांडे, बी.एस.हेलसकर, बी.एम.देवकते, एस.डी.गांजापूरकर, वर्षा कदम, प्रतिज्ञा चव्हाण, सुजय कांबळे, अशोक लिंबेकर, काशीनाथ पल्लेवाड, संभाजी रोडगे यांनी पुढाकार घेतला.
♦शिक्षक झाले अधिकारी, अन् विद्यार्थी मतदार
दोन जागांसाठी एकूण अठरा उमेदवार रिंगणात होते. १११ पैकी एकूण ७२ विद्यार्थी वर्ग प्रतिनिधी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक संतोष पाटील, तर शिक्षकांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले. तहसीलदार दिनेश झांपले यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर ट्रेनर संतोष मलसटवाड, गजाजन साळवे, एच.जी.बुचाले यांनी सहकार्य केले. अभिरूप मतदान केंद्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या निमित्ताने शिक्षक झाले अधिकारी, अन् विद्यार्थी मतदार, असे चित्र पाहायला मिळाले.
लोकशाही पद्धतीने विद्यार्थी संसद प्रतिनिधी निवडणूक पार पडली. पहिल्यांदाच मतदान केले. मतदानाविषयीची मनातील भिती दूर झाली. – अक्षरा बोकन, इयत्ता दहावी.
अठरा वर्षाच्या नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. परंतु, शाळेच्या ‘लोकशाही उत्सवा’ ने मला प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन व मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची संधी मिळाली. खूप आनंद झाला. – जय चौधरी, इयत्ता सातवी