पोलिस प्रशासन : रविंद्रसिंह परदेशी परभणीचे नवे पोलीस अधीक्षक
जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पाच सहाय्यक निरीक्षकांचाही समावेश
परभणी : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह खात्याने उच्चपदस्त पोलिस अधिकार्यांच्या बुधवारी मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या असून परभणीतील पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांची मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली असून, या रिक्त जागी चंद्रपूरहुन रविंद्रसिंह परदेशी यांची जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह खात्याने मोठ्या प्रमाणावर केलेल्या बदल्यांमध्ये जवळपास ४२ अधिकार्यांचा समावेश आहे.
♦सेलूच्या पोलिस निरीक्षकपदी प्रभाकर कवाळे, समाधान चवरे परभणीला
परभणी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षक, पाच सहाय्यक निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी याबाबतचे आदेश मंगळवारी (३० जानेवारी) काढले आहेत. यात परभणीतील नवा मोंढा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांना जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे. त्यांच्याकडे पोलीस उपअधिक्षकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सेलूचे पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांची नवा मोंढा परभणी येथे बदली करण्यात आली आहे. चवरे यांची सेलू शहरातील अवघ्या सहा महिन्यांची कारकिर्द प्रभावी ठरली. पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांची कोतवाली ठाणे, दिपककुमार वाघमारे यांची गंगाखेड, विलास बोबडे यांची पूर्णा, बालाजी मोहिते यांची पाथरी, बुध्दीराज सुकाळे यांची जिंतूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. जिंतूरचे पोलिस निरीक्षक दिलीप तिडके यांची जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे. तसेच सपोनि आनंद बनसोडे यांची जिंतूर, विकास कोकाटे यांची नवा मोंढा, प्रभाकर कवाळे यांची सेलू पोलिस ठाणे, रामकिशन नांदगावकर यांची पूर्णा, तर राजेंद्र मुंढे यांची पालम पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.