शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरा; अन्यथा तीव्र आंदोलन, माजी आमदार भांबळे यांचा इशारा
परभणी : जिंतूर व सेलू तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा, माजी आमदार विजय भांबळे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. १६ फेब्रुवारी रोजी भांबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीर विनय मून यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व शिक्षकांच्या रिक्त जागेचा प्रश्न किती गंभीर आहे, हे निदर्शनास आणून दिले. सेलू तालुक्यात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्यामुळे पालकांचा ओढ खाजगी संस्थांकडे जास्त होत आहे व विद्यार्थी संख्या कमी होऊन जिल्हापरिषदच्या शाळेतील शिक्षक आणखी कमी केले जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होत आहे. तसेच अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने गावातील पालक विद्यार्थ्यांना मजूर म्हणून ऊसतोडीसाठी सोबत घेऊन जात आहेत. यामध्ये जिंतूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक ३४, माध्यमिक शिक्षक ११, पदवीधर शिक्षक ७८, मुख्याध्यापक १३ तर सेलू तालुक्यात प्राथमिक शिक्षक ३०, माध्यमिक शिक्षक ४, पदवीधर शिक्षक ४१, मुख्याध्यापक ११ अश्या एकूण २२२ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्यासाठी जिंतूर सेलू तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून ( मा.शरद पवार गट) तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा लेखी इशारा माजी आमदार विजयराव भांबळे साहेब यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना दिला आहे. या वेळी प्रसादराव बुधवंत, रामराव उबाळे, अजयभैया चौधरी, मुरली मते, रितेश काळे, गजानन कांगणे, नंदुभाऊ अंभोरे, राहुल घुले, गणेशराव घुगे इत्यादींसह कार्यकर्ते उपस्थित होते.