संजय गांधी निराधार योजना समितीच्या सेलू तालुकाध्यक्षपदी डॉ.संजय रोडगे
डॉ.संजय रोडगे यांनी निवडीबद्दल धन्यवाद व्यक्त करून समाजातील निराधार व गरजू जनतेची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. या योजनेअंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत लाभार्थ्यांना वेळेवर मदत पोहोचती करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. या सर्व योजनांची प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवीली जाईल. यामध्ये कुठल्याही दलालांचा हस्तक्षेप किंवा दलालामार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही याची विशेष काळजी समितीमार्फत घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.
सेलू जि.परभणी : सेलू तालुका तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये निरंतर निस्वार्थी सेवा करणारे डॉ.संजय रोडगे यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या सेलू तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती म्हणून केलेल्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याकडून ही निवड करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये विशेषतः महिला, बालके, मागासवर्गीय, आदिवासी इत्यादी घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विधवा महिला, अनाथ, अत्याचारित महिला, आणि निराधार महिला यांच्यासाठी देखील या योजनेचा लाभ दिला जातो. निवडीबद्दल डॉ.रोडगे यांचा सत्कार करण्यात आला.
संजय गांधी निराधार योजना समिती : अध्यक्ष, डॉ.संजय रामराव रोडगे, अशासकीय प्रतिनिधी, सदस्य कमल दीपक चव्हाण, तुकाराम नामदेव घनवटे, विलास सोनवणे, विष्णू त्र्यंबक बुधवंत, दत्ता रघुनाथ गिरी, ज्योती राजेश मोगल, दत्तराव ज्ञानोजी जाधव, शासकीय प्रतिनिधी सदस्य गणेश मंडलिक व दिनेश झांपले.