मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा : खवणे पिंपरीची जिल्हा परिषद ,वालूरची शांताबाई नखाते आश्रमशाळा ठरल्या ‘सुंदर’
सेलू जि.परभणी : राज्य शासनाकडून शिक्षण विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानातील मूल्यांकनाचा तालुकास्तरीय निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद शाळा गटात खवणे पिंपरीच्या जिल्हा परिषद शाळेने, तर खाजगी संस्था गटातून वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळेने प्रथम क्रमांक पटकावून सेलू तालुक्यातील ‘सुंदर’ शाळा ठरल्या आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात आले होते. शाळा, वर्ग सजावट, क्रीडा सुविधा, आर्थिक साक्षरता, विद्यार्थी गुणवत्ता, स्वछता, आरोग्य, भौतिक सुविधा आदी ६० मुद्यांवरील बाबींचा उपक्रमाच्या गुणांकनात सामावेश होता. पहिल्या टप्प्यात केंद्रस्तरीय समीतीने मूल्यांकन करून खाजगी व जिल्हा परिषद गटातून प्रत्येकी एका शाळेची निवड केली. त्यानंतर सर्व केंद्रातील ९ खाजगी व ९ जिल्हा परिषद शाळेचे तालुकास्तरीय मूल्यांकन गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, भुजंग थोरे, गजानन भिते, जनार्दन कदम, अरूण राऊत यांच्या तालुकास्तरीय समितीने केले. यामध्ये श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूर चा खाजगी गटातून पहिला क्रमांक आला. या आश्रमशाळेत संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते, सचिव भावनाताई नखाते, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शाम मचाले, प्राचार्य रमेश नखाते, नोडल कर्मचारी रेवणअप्पा साळेगावकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
♦तालुकास्तरीय सुंदर शाळा अशा
श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळा वालूर (प्रथम), प्रिन्स इंग्लिश स्कुल सेलू (द्वितीय), नूतन प्राथमिक शाळा, सेलू (तृतीय), तर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद शाळा खवणे पिंपरी(प्रथम), जिल्हा परिषद शाळा पारडी, (द्वितीय), जिल्हा परिषद केंद्रीय शाळा चिकलठाणा (बु.) तृतीय या शाळेचा सामावेश आहे.
♦जिल्हास्तरीयस्तरीय समितीकडून मूल्यांकन
तालुकास्तरावर निवड झालेल्या शाळेला प्रथम ३ लाख रुपये, द्वितीय २ लाख रुपये व तृतीय १ लाख रुपये स्वरूपात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तालुक्यात प्रथम आलेल्या श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूर व जिल्हा परिषद शाळा खवणे पिंपरी या शाळेची बुधवारी जिल्हास्तरावरील समितीकडून मूल्यांकन तपासणी करण्यात आली आहे.