सामूहिक राष्ट्रगीताने फुलले चैतन्य

सामूहिक राष्ट्रगीताने फुलले चैतन्य

सेलू : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी (९ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता आयोजित सामूहिक राष्ट्रगीत गायनाने अवघा परिसर चैतन्याने फुलून गेला.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगरपालिकेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे सुमारे पंधरा हजारहून अधिक विद्यार्थी; तसेच महिला, नागरिक, शिक्षक, कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शालेय विद्यार्थ्यांनी; तसेच नागरिकांनी केसरी, हिरवा, पांढर्‍या रंगातील टी शर्ट, टोप्या परिधान केल्या होत्या. हाती धरलेले तिरंगा ध्वज, देशभक्तीपर गीतांनी वातावरण स्फूर्तिदायक झाले. या वेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, मुख्याधिकारी देविदास जाधव, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विविध पक्ष, सामाजिक, शैक्षणिक संस्था संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरासह ग्रामीण भागात विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. सायकल रॅली, चित्रकला, समूहनृत्य, समूहगीत गायन आदी सांस्कृतिक उपक्रमांमधून कमालीचा उत्साह दिसून आला. पंधरा ऑगस्टपर्यंत शहरासह ग्रामीण भागात शाळा, सामाजिक संस्था व प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घरोघरी तिरंगा अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सेलू नगरपालिकेच्या स्टॉलवर नागरिकांसाठी अल्पदरात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुरुवारी (११ ऑगस्ट) दुपारी तीन वाजता श्री साईबाबा मंदिरात महिला व मुलींसाठी देशभक्तीपर रांगोळी स्पर्धा आहे; तसेच तिरंगा रंगांमधील खाद्यपदार्थ स्पर्धा आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेलू (जि.परभणी) येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी आयोजित सामूहिक राष्ट्रगीत गायनात शेकडो शालेय विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते. ( छायाचित्रे : शंभू काकडे)

हे पण वाचा : सेलूत बहरणार ५००० झाडांचे घनवन !

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!