अजंता, नरसापूरला सेलूत थांबा; रेल्वेमंत्री दानवे यांची ग्वाही
सेलू रेल्वे प्रवासी संघाचे निवेदन, जालना येथे घेतली रेल्वेमंत्री दानवे यांची भेट
सेलू जि.परभणी : अजंता, साईनगर शिर्डी, नरसापूर, जयपूर एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांना सेलू (जि.परभणी) स्थानकावर थांबा मंजूर करण्यात येणार आहे, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी (३० एप्रिल) दिली आहे.
सेलू रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालना येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी प्रवासी संघाचे रमेश काला, विजय मंत्री, व्यंकटेश काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. सेलू शहर हे ६० हजार लोकवस्तीचे तालुक्याचे ठिकाण आहे. परिसरातील १२५ ते १५० गावांसह पाथरी, मंठा, मानवत रोड, जिंतूर या तालुक्यातील नागरिक रेल्वे प्रवासाला सेलूतून सुरुवात करतात. सेलूतून वार्षिक सुमारे पाच कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळत आहे. हैदराबाद-जयपूर साप्ताहिक एक्सप्रेस गाडी क्रमांक क्रमांक १७०१९-२० आणि नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस गाडी क्रमांक १७२१३-१७२१४ या गाडीला सेलू येथे थांबा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच; अजंता व साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचा करोना काळात बंद झालेला थांबा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मंत्री दानवे यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे, असे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.