सेलूतील रामदासी कीर्तन शिबिर उत्साहात; विविध पुरस्कारांचे वितरण

सेलूतील रामदासी कीर्तन शिबिर उत्साहात; विविध पुरस्कारांचे वितरण

योगेश महाराज साळेगावकरांचा ‘कीर्तन भास्कर पुरस्कार’ने गौरव, संतमंहतांची उपस्थिती, शिबिराला मोठा प्रतिसाद

 

सेलू जि.परभणी : येथील श्री केशवराज बाबासाहेब संस्थान व स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तनकुल यांच्यावतीने आयोजित दहा दिवसीय सहाव्या रामदासी कीर्तन प्रशिक्षण शिबिराचा समारोप व पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी, २० मे रोजी सायंकाळी संपन्न झाला. या वेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.

या वेळी सचिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्वामी जगद्गुरु शंकराचार्य,  समर्थ भक्त योगेशभाऊ रामदासी , आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज, कालिदास महाराज आदी मान्यवर संतासह सत्कारमूर्ती गणेश बुवा रामदासी, अभिजीत महाराज गोंदीकर व भक्ती अरविंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी संयोजकांच्या वतीने ‘देवश्री नारद पुरस्कार’ संभाजीनगर येथील गणेशबुवा रामदासी यांना, तर ‘वेदव्यास पुरस्कार’ जालना येथील भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांना तसेच स्वामी विवेकानंद पुरस्कार अमरावती येथील भक्ती (हरिप्रिया)अरविंद देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. संयोजकांच्या वतीने दोन नवीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात घनपाठी वैदिक पुरस्काराचे तथा योगेश्वर याज्ञवलकी घनपाठी पुरस्कार वेदमूर्ती शिशिर दिगंबर मुळे यांना परमपूज्य कालिदास महाराज यांच्या हस्ते तर ऋषिकेश रामेश्वर व्यास यांना परमपूज्य शंकराचार्य यांच्या हस्ते घनपाठी वैदिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महावस्त्र, जोड आहेर, स्मृती चिन्ह व रोख ३१०० रूपये देऊन गौरवण्यात आले आहे. संयोजक योगेश महाराज साळेगावकर यांना परमपूज्य श्री सचिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर,करवीर यांच्यावतीने ‘कीर्तन भास्कर पुरस्कार’ प्रदान करून गौरव करण्यात आला आहे.

सेलू येथील श्रीमती विरजा डिग्रसकर यांनी कीर्तन प्रशिक्षण शिबिरासाठी दासबोध ग्रंथांची हस्तलिखित भेट दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. अमरावती येथील प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांचा अमृताश्रम महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावर्षी प्रशिक्षण शिबिरातील एकूण ५२ विद्यार्थ्यांपैकी सर्वोत्कृष्ट कीर्तनकार म्हणून सोहम महाराज पांचाळ यांना कै.प्रमोद साळेगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्वोत्कृष्ट कीर्तनकार हा पुरस्कार शंकराचार्य स्वामी महाराज यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला आहे.

स्वतःचे कीर्तन बंद करून कीर्तन शिकवणारा शिक्षक म्हणजेच गुरुजी समाजामध्ये अपवादानेच भेटतात. विद्यार्थी आणि समाजाला प्रकाशित करतात. धर्माची चिंता करत करत अहो रात्र काम करत असतात. धर्म, देश व देव यांच्यासाठी काम करत असताना स्वतःच्या विरोधात भारतात विविध ठिकाणी २३ प्रकारचे गुन्हे दाखल करून घेणारे धर्म, देश व देव यासाठी सतत संघर्ष करून संपूर्ण देशामध्ये काम करणारे योगेश महाराज साळेगावकर यांची दखल, संकेश्वर करवीर पीठ संस्थानने घेऊन यावर्षी सेलू येथील पुरस्कार वितरण समारोह प्रसंगी त्यांना कीर्तन भास्कर पुरस्कार देऊन त्यांचा मोठा गौरव करण्यात आला आहे. यामुळे सेलू शहराच्या नावावर व सेलू शहरासाठी ही फार मोठी आनंदाची व अभिमानाची बाब यावर्षीच्या कुर्तन प्रशिक्षण शिबिरामध्ये घडली आहे.
संपूर्ण सोहळ्याचे साक्षीदार म्हणून जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज, अमृताश्रम स्वामी महाराज योगेशबुआ रामदासी महाराज, कालिदास महाराज, प्रमोद शास्त्री कुलकर्णी, पोपटशास्त्री चौथाई वाले गुरुजी आदींची प्रमुख उपस्थिती होती.कीर्तन शिबिराच्या सहाव्या वर्षी एकूण ५३ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आणि यातील १३ विद्यार्थ्यांनी शनिवार २० मे रोजी दिवसभर कीर्तन सादर करून प्रशिक्षण शिबिरातून आपल्याला काय मिळाले ? हे सिद्ध करून दाखवले.

शिबिराबद्दल प्रतिक्रिया 

सायली कुलकर्णी : विद्यार्थ्यांमधील गुण शोधून काढण्याचे काम योगेश महाराज यांनी केले आहे. कीर्तन हा भगवंताच्या भक्तीचा सोपा मार्ग आहे. कीर्तन कशासाठी ? व कोणासाठी? करायचे याचे ज्ञान आम्हाला या शिबिरातून मिळाले. सोहम पांचाळ : सेलू येथील प्रशिक्षण शिबिरात आम्हाला सहभाग नोंदवता आला हे आमचे परम भाग्य आहे. हा प्रवास सोपा नव्हता. इयत्ता आठवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी सेलू येथील स्वामी गोविंददेव रामदासी कीर्तनकुल प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवला. मला चित्रकला व कीर्तनाची आवड लहानपणापासून आहे. आतापर्यंत मी वारकरी कीर्तन करत आलो. माझे वारकरी कीर्तन ३५ वेळा झाले. मात्र आज मी रामदासी कीर्तन प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवल्यानंतर रामदासी कीर्तन चार वेळा केले आहे. मला हे खूप आनंद देणारे वाटले. माझ्या गीता परिवारातील मार्गदर्शिका प्रेमलाताई कुलकर्णी यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्यांचे व संयोजकाचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
रेणुका मिसळ : हीने कीर्तन शिबिरातील आपले अनुभव व्यक्त करताना म्हटले आहे की, दहा दिवस कीर्तन शिबिर झाले.ज्ञगुरुशिवाय विद्यार्थी शोभत नाही. आम्ही योगेश महाराजांना कधी विसरणार नाही. कारण धर्म, देश व देव यासाठी कायम संघर्ष करण्याचे बळ आम्हाला त्यांच्याकडून मिळाले. धर्म आचरणारा हा खूप मोठा असतो .व त्यामुळे आयुष्याला गती मिळते. लक्ष्मी चौथाईवाले : येथील ज्ञानरूपी प्रकाशाने माझे डोळे उघडले. कीर्तन शिकण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन आम्हाला अनेक धडे देण्याचा प्रयत्न झाला. हा प्रशिक्षण वर्ग नसून आमच्यासाठी परिवार आहे. इथे आल्यानंतर आम्हाला आमच्या घराची उणीव देखील भासली नाही .गुरु आणि गुरु माय यांनी आमच्यावर कौटुंबिक प्रेम केले. उमाकांत कुलकर्णी : आपला पाल्य जगामध्ये कोठेही जाताना कोणते विचार घेऊन जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपला पाल्य कायम संतांच्या विचारांच्या सानिध्यात आल्या नंतर त्याचे व कुटुंबाचे जीवन मौल्यवान होते. आपले पाल्य हे संतांच्या हातात आहेत, त्यामुळे आजचा हा दिवस विद्यार्थी व आम्हा पालकांसाठी मोठा गौरवाचा दिवस आहे .पालक म्हणून खूप आनंद होत आहे . कीर्तन कशासाठी करावे याचे योग्य मार्गदर्शन आमच्या पाल्यांना इथे मिळाले आहे. म्हणून या कीर्तन प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही पालक म्हणून खूप समाधानी आहोत.

यावेळी कीर्तन शिबिरासाठी विशेष योगदान देणारे प्रदीप साळेगावकर, रघुनाथपंत कुलकर्णी, नागेंद्रदास मुळे यांचा गौरव करण्यात आला .सूत्रसंचालन लक्ष्मीप्रसाद पटवारी व देवाहुती गांजा पुरकर यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक प्रकाश कुरुंदकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ऋग्वेद घोषात ध्वज पूजन तर यजुर्वेदाच्या घोषात संत पूजन करण्यात आले. लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी प्रशिक्षण शिबिरातील विद्यार्थी शिबिर गीत सादर केले. योगेश महाराज साळेगावकर यांनी आभार मानले.


सेलूच्या सभापतीपदी चक्रधर पौळ, प्रकाश मुळे उपसभापती; विजयाचा महाविकास आघाडीकडून जल्लोष

पोलिस भरती : विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे ४१ पोलिसांचा सन्मान

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!