सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी सोहळा उत्साहात
भक्तिमय वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल व कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी, २८ जून रोजी सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, विविध संत, वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ, मृदंग, चिपळ्यासह पंढरपूर वारीचे साक्षात दर्शन करून दिले. विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठलाच्या अभंगांचे गायन केले. संगीत शिक्षक विलास शेरे यांनी ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग सादर करून मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाला श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ.रोडगे आषाढी एकादशीचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व सांगितले. यानिमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी अवघे पंढरपूर दुमदुमून निघते. हा सोहळा अवर्णनीय आहे, असे डॉ.रोडगे म्हणाले.
कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद खंदारे, विलास शेरे, वंदना खरावणे, अश्विनी हिबारे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.