परभणी मेडिकल : शासकीय कोट्यातून शंभर प्रवेश; रूग्णसेवा, उपचारांचा दर्जा उंचावणार

परभणी मेडिकल : शासकीय कोट्यातून शंभर प्रवेश; रूग्णसेवा, उपचारांचा दर्जा उंचावणार

४३० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी, ८८ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रूग्णसेवेला उपलब्ध

परभणी : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली अंतर्गत मेडिकल असेसमेंट अँड रेटींग बोर्ड (MARB) यांनी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी या संस्थेस शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ साठी १०० विद्यार्थी प्रवेशित करण्यासाठीची परवानगी बुधवारच्या (५ जुले) शासन निर्णयानुसार बहाल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे उपसचिव अजित सासुलकर यांनी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे. परभणी येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर सुरू करण्यास शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आल्याचे त्यात नमूद केले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरिररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.शिवाजी सुक्रे यांनी १० मे रोजी परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आत, परभणीकरांनी केलेल्या संघर्षाला फलद्रूप करण्यात डॉ.सुक्रे यांचे प्रयत्नही यशस्वी ठरले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवेचा स्तर उंचावण्यासाठी मोठी मदत होणार आहे. अधिकचे ८८ तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने विविध आजारांवरील मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या होतील. सर्व सामान्य रुग्णांना परवडतील, असे वैद्यकीय उपचार मिळण्याची सुविधा निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अंबाजोगाई, लातूरला मिळणारे उपचार परभणीतच मिळणार आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी व संघर्षसमितीच्या वतीने केलेल्या पाठपुरावा, तसेच जिल्हाप्रशासन, वैद्यकीय विभागातील वरिष्ठ, अधिकारी, रुग्णालय, महाविद्यालय व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या टीम वर्कचे यासाठी मोठे योगदान लाभले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुपाने परभणी शहराच्या लौकिकात निश्चितच भर पडली आहे, अशा भावना वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी ‘सकाश’ बोलतांना व्यक्त केल्या.

या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे परभणीकरांचे स्वप्न पूर्णत्वास गेले आहे. या वर्षी महाराष्ट्रातील ८५ आणि देशपातळीवरील १५ असे एकूण शंभर विद्यार्थ्यांचे प्रवेश गुणवत्तेवर होणार आहेत हे विशेष. आगामी काळात विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णसेवा आणि महाविद्यालयाचा दर्जा सतत उंचावण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने निश्चितच प्रयत्नरत राहणार आहे.

– डॉ.शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी

परभणी मेडिकल : शासकीय कोट्यातून शंभर प्रवेश; रूग्णसेवा, उपचारांचा दर्जा उंचावणार


आर.बी.घोडके यांचा कर आयुक्तांकडून सन्मान; सर्वाधिक जीएसटी भरण्यात परभणी जिल्ह्यात अव्वल स्थान

संचालक डॉ.दीपक म्हैसेकर यांची परभणी मेडिकल कॉलेजला भेट; सोयीसुविधांचा घेतला आढावा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!