स्वातंत्र्य दिन : परभणीचे कृष्णा भोसले यांना दिल्लीचे आमंत्रण; लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणासाठी उपस्थित राहणार
पालम तालुक्यातील पेठपिंपळगावामध्ये उभारला कृषीपूरक उद्योग
परभणी : जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठपिंपळगावचे युवा कृषी उद्योजक कृष्णा भाऊसाहेब भोसले यांना केंंद्र शासनाकडून दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनी (दि.15) होणार्या ध्वजारोहणास उपस्थित राहण्याचे विशेष आमंत्रण मिळाले आहे.
15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन मुख्य सोहळा होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर ते देशाला संबोधित करतील. या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी कृष्णा भोसले यांना मिळणार आहे. कृष्णा भोसले हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाऊसाहेब दिगंबरराव भोसले यांचे चिरंजीव असून त्यांनी लहान वयातच उद्योजक बनण्याचे धाडस केले आहे. त्यांनी आपल्या गावात पेठपिंपळगाव येथे स्वतःच्या शेतामध्ये जवळपास सात ते आठ एकरामध्ये कुक्कुटपालनाचा असा उद्योग उभा केला आहे. तसेच शुभाशिष अग्रो प्रोडूसर कंपनी स्थापन करून केंद्र शासनाकडे अनुदानासाठी पाठपुरावा करून हा व्यवसाय उभा केला. या उद्योगांमधून वर्षाकाठी लाखोंची उलाढाल होते. याचीच दखल घेऊन केंद्राकडून उत्कृष्ट उद्योजक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) योजनेच्या 24 लाभार्थ्यांना नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2023 रोजी होणार्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरून केलेले भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 1800 व्यक्तींमध्ये या योजनेच्या अडीचशे लाभार्थ्यांचा त्यांच्या जोडीदारासह समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातून पेठपिंपळगाव (ता.पालम) येथील युवा कृषी उद्योजक कृष्णा भाऊसाहेब भोसले यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या ’लोकसहभागाच्या संकल्पनेला अनुसरून, केंद्र सरकारने देशभरातून, समाजाच्या विविध घटकांतील लोकांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्याचा हा उपक्रम हाती घेतला आहे.