श्रीमहेश्वर शिवलिंग : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी ; सेलूतील श्रीसाईबाबा मंदिरात तीन दिवस अध्यात्मिक उत्सव
सेलूतील श्रीसाईबाबा मंदिर परिसरात श्रीमहेश्वर शिवलिंगाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मंगळवारी, पाच सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भाविकांचा मोठा सहभाग या सोहळ्यामध्ये असणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी, एक सप्टेंबररोजी जवळपास तीन टन वजनाच्या श्रीमहेश्वर शिवलिंगाची विधिवत स्थापना करण्यात आली. मुकेशराव बोराडे, विजया बोराडे यांच्याहस्ते ही पूजा झाली. रविवारी, तीन सप्टेंबररोजी परिसरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरू होती. कीर्तनांसह विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेलू जि.परभणी : येथील महेशनगरातील श्रीसाईबाबा मंदिरामध्ये श्रीमहाबलीपुरम (तामिळनाडू) येथून आणलेल्या श्री महेश्वर शिवलिंगाची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा पाच ते सात सप्टेंबर या कालावधीत आयोजिण्यात आला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
मंगळवारी, पाच सप्टेंबररोजी सकाळी दहा वाजता प्राणप्रतिष्ठा पूजा, गणपती पूजन, स्वस्ती पुण्यवाचन, मातृकापूजन, नान्दीश्राद्ध आचार्यवर्णन, देवता स्थापना, जलाधीवास, आरतीनंतर रात्री आठ वाजता संतोष महाराज आढवणे यांचे हरिकिर्तन होईल. बुधवारी, सहा सप्टेंबररोजी सकाळी दहा वाजता प्राणप्रतिष्ठा पूजा, अग्निस्थापणा, नवगृह स्थापणा हवन, मुख्यदेवता हवन, धान्यादिवास, शय्यादिवास, निद्रा आवाहन व आरती व रात्री आठ वाजता माणिक महाराज रेंगे यांचे हरिकिर्तन होईल. गुरुवारी सात सप्टेंबररोजी सकाळी दहा वाजता प्राणप्रतिष्ठा पूजा, महाअभिषेक होईल. बलिदान पुर्णाहूती, आरतीनंतर वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरू सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, साखरखेर्डा, सद्गुरू काशिनाथ शिवाचार्य महाराज, पाथरी, सद्गुरू विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज, आष्टी यांच्या दिव्य साक्षीने व मंत्रोच्चाराने कार्यक्रम संपन्न होत आहे. रात्री आठ वाजता शिवा महाराज बावस्कर यांचे हरिकिर्तन होईल.
सोहळ्यामध्ये गायनाचार्य माऊली महाराज चव्हाण, वारकरी भूषण गजानन महाराज मुंडे, सोपान महाराज चव्हाण, मृदंगविशारद कार्तिक महाराज हिंगणे, कृष्णा महाराज जाधव, नवनाथ महाराज गायकवाड यांची साथसंगत लाभणार आहे. याप्रसंगी मृदंगमहामेरू भरत महाराज पठाडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
गुरूवारी, सात सप्टेंबररोजी श्रीमहेश्वर शिवलींग स्थापनेनंतर दुपारी बारा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत भाविक भक्तांच्या हस्ते शिवलिंगाच्या जलाभिषेक होणार आहे.
बारा ज्योतीलिंगातील तीर्थ व भारतातील प्रमुख नद्यांच्या पवित्र जलाने श्रीमहेश्वर शिवलिंगाच्या जलाभिषेकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जलाभिषेक करणार्या भाविकांना हरिद्वार येथून सिध्द केलेले प्रसादरुपी रुद्राक्ष, विभुती व शिवलीलामृत पोथीचे वाटप होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता श्रीमहेश्वर शिवलिंगाची महाआरती होईल. आरतीचे ताट मंदीरातून मिळेल,असे संयोजकांनी कळविले आहे. भक्तांनी कीर्तन व विविध कार्यकमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
गुरूवारी, सात सप्टेंबररोजी श्रीमहेश्वर शिवलिंग स्थापनेनंतर दुपारी बारा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत सेलूतील सर्व भाविकभक्तांच्या हस्ते बारा ज्योतीलिंगातील तीर्थ व भारतातील प्रमुख नद्यांच्या पवित्र जलाने श्रीमहेश्वर शिवलिंगाच्या जलाभिषेकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर हरिद्वार येथून सिध्द केलेले प्रसादरुपी रुद्राक्ष, विभुती व शिवलीलामृत पोथीचे वाटप होणार आहे. जलाभिषेक (एक लोटा जल) अर्पण करुन पुण्यार्जन करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.